दक्षिण कोरियाप्रमाणे कौशल्य विकासाला भारतानेही महत्त्व द्यावे- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:29 PM2019-05-09T14:29:20+5:302019-05-09T14:31:30+5:30

‘काळाची पावले ओळखून रयत शिक्षण संस्थेने कौशल्य विकासावर भर दिला आहे.

should give importance to skill development like South Korea - Sharad Pawar | दक्षिण कोरियाप्रमाणे कौशल्य विकासाला भारतानेही महत्त्व द्यावे- शरद पवार

दक्षिण कोरियाप्रमाणे कौशल्य विकासाला भारतानेही महत्त्व द्यावे- शरद पवार

googlenewsNext

सातारा : ‘काळाची पावले ओळखून रयत शिक्षण संस्थेने कौशल्य विकासावर भर दिला आहे. कर्तृत्ववान पिढी घडविण्याचे कार्य ‘रयत’ करत असून यानिमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वप्नांची पूर्तता होताना दिसत आहे,’ असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले. 
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य प्रा. एन. डी. पाटील, आ. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, गणपतराव देशमुख, रामशेठ ठाकूर, शशिकांत शिंदे, बबनराव पाचपुते, विश्वजित कदम, मोहनराव कदम, शिवाजीराव कदम, हणमंतराव गायकवाड, चंद्रकांत दळवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. खा. पवार म्हणाले, ‘रयतमधील दोन विद्यार्थ्यांची नुकतीच इस्त्रो संशोधन संस्थेत निवड झाली,  ही बाब गौरवास्पद आहे. संस्था अनेक क्षेत्रांत काम करत आहे. शेती, कौशल्य विकास, गुणवत्ता वाढीवर भर देण्यात आलेला आहे. लोकांनी संस्थेला जमिनी दिल्या. या जमिनींत केळी, ऊस, अशी पिके घेण्यात आली. फळबाग लावण्यात आलेल्या आहेत. सर्व ठिकाणी ठिबक यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याची गरज वाढलेली आहे. आपण शेतीच्या विकासासाठी मोठे काम केले आहे. इंडियन अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च या संस्थेत महाराष्ट्रातील ५ हजारांपेक्षा जास्त शास्त्रज्ञ काम करत आहेत. दक्षिण कोरिया हा दिवस महाराष्ट्राच्या निम्मा आहे. या देशात पंतप्रधान, मोठा अधिकारी व्हायचं असेल तरी कौशल्य विकास शिकणं आवश्यक केलेले आहे. त्याच पध्दतीने आपल्या देशातही उपाययोजना होणे गरजेचे आहे.’ रयततर्फे कौशल्य विकास व संभाषण कौशल्य विकासाच्या अनुषंगाने भरीव काम करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी वेगळी इमारत सातारा येथे उभी करण्यात येणार आहे.  या कामासाठी लागणा-या अपेक्षित निधीपेक्षा जास्त निधी गुरुवारी जमा झाला.

एकाच दिवसांत ४ कोटींचा निधी

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी संस्थेला विविध मान्यवरांच्यावतीने तब्बल ४ कोटी रुपयांची मदत मिळाली. रयतेला नेहमीच सढळ हाताने मदत करणारे रामशेठ ठाकूर यांनी १ कोटी दिले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने १  कोटी देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १ कोटी जाहीर केले. संस्थेचे माजी विद्यार्थी व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या कुटुंबीयांच्या वतीने १ कोटी रुपयांची मदत देण्यात आली.
 

Web Title: should give importance to skill development like South Korea - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.