आमदार पत्नी म्हणून निवडणूक लढवू नये काय?
By Admin | Published: October 29, 2016 12:28 AM2016-10-29T00:28:15+5:302016-10-29T00:30:20+5:30
वेदांतिकाराजेंचा सवाल : नगरविकास आघाडीच्या स्वतंत्र बैठकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
सातारा : ‘आमदार घरातील आहे म्हणून आम्ही निवडणूक लढवायची नाही का? आम्ही आमचे कर्तव्य जाणतो. जो कर्तबगार तो पदासाठी योग्य. ५० टक्के आरक्षण कशासाठी दिले आहे?,’ असा सवाल वेदांतिकाराजे यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांना केला.
कोटेश्वर मंदिराजवळील कला वाणिज्य महाविद्यालयाच्या आवारात आयोजित नगरविकास आघाडीच्या स्वतंत्र बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले होते.
त्या म्हणाल्या, ‘विसाव्या वर्षी माझं लग्न झालं तेव्हापासून मी साताऱ्यात राहते. ‘कर्तव्य’ सोशल ग्रुपच्या माध्यमातून मी साताऱ्यात कार्य करते, तर साताऱ्यातच मी शैक्षणिक कार्य करत आहे. मी एक गृहिणी आहे. मी माझ्या कुटुंबाची काळजी घेते. जे मी माझ्या घरासाठी करते तेच मी माझ्या शहरासाठी करणार आहे. कोणत्याही घरातील समस्या कधीच संपत नाहीत. तीच परिस्थिती शहराची असते.’
‘माझ्या स्वच्छ, सुंदर घराबद्दल ज्या अपेक्षा आहेत, त्याच शहराबद्दल आहेत. मनोमिलनाच्या माध्यमातून पालिकेत चांगले कामकाज झाले आहे. कर्तव्य ग्रुपच्या माध्यमातून, वॉर्ड कमिटीच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित कामे केली आहेत.’
‘माझी उमेदवारी म्हणजे प्रत्येक महिलेची उमेदवारी आहे. त्यामुळे प्रत्येक महिला नगराध्यक्ष असणार असून, पालिकेच्या कामकाजात लोकसहभाग असणार आहे. मला हातात झाडू घ्यायला कधीही लाज वाटली नाही. रस्ता झाडण्याचे कार्य प्रथम कर्तव्य सोशल ग्रुपने केले आहे. साताऱ्याने मला खूप काही दिले आहे,’ असेही वेदांतिकराजे
यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले. (प्रतिनिधी)
मनोमिलन तुटल्याने पोलिस खाते अलर्ट...
४पालिकेमध्ये मनोमिलन तुटल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिस खाते अलर्ट झाले आहे. गेल्या महिनाभरापासून मनोमिलनावर वॉच ठेवून असणाऱ्या साध्या वेशातील पोलिसांवरील तणाव शुक्रवारी अधिकच वाढल्याचे पाहायला मिळाले.
४सातारा पालिकेत कोणाला मनोमिलन हवे होते तर कोणाला नको होते. मात्र, पोलिसांसाठी मनोमिलन होणे गरजेचे होते. कारण मनोमिलन झाले असते तर तणावाची परिस्थिती निर्माण झाली नसती. खेळीमेळीच्या वातावरणात गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुका जशा पार पडल्या, त्याच प्रकारे ही सुद्धा निवडणूक पार पडेल, अशी पोलिसांना आशा होती. त्यामुळे मनोमिलनाच्या घडामोडींवर पोलिसांच्या एका गोपनीय टीमचे बारकाईने लक्ष होते.
४अदालत वाड्यावर कधी बैठक आहे, दोन्ही राजे साताऱ्यात आलेत का, दोन्ही आघाड्यांमध्ये वातावरण कसे आहे, कोण प्रक्षोभक वक्तव्य करतेय, याची इंत्थभूत माहिती या टीमकडून घेतली जात होती. पोलिसांनाही. मनोमिलनाच्या घडामोडींचा रिपोर्ट त्यांना वरिष्ठांना सादर करावा लागत होता. मनोमिलन व्हावे, अशी अपेक्षा या पोलिसांची होती. मात्र, शुक्रवारी ही त्यांची अपेक्षा फोल ठरली.
उदयनराजे गटाकडून माधवी कदम अर्ज भरणार
सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे गटाच्या सातारा विकास आघाडीकडून माधवी कदम यांचे नाव शुक्रवारी रात्री उशिरा निश्चित करण्यात आले. त्या शनिवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली. यादोगोपाळ पेठेतील डॉ. संजोग कदम यांच्या त्या पत्नी आहेत.