शहरात जागा दाखवा... स्वच्छतागृह बांधू !
By admin | Published: July 9, 2015 10:51 PM2015-07-09T22:51:36+5:302015-07-09T22:51:36+5:30
शिवेंद्रसिंंहराजे : वार्ड कमिटी बैठकीत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा
सातारा : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेल्या वार्ड कमिटीमुळे नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होत आहे. नागरिक थेट आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडत आहेत. यामुळे शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली असून वार्ड कमिटीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंंहराजे यांनी केले. तसेच, यावेळी तुम्ही जागा दाखवा, तिथे स्वच्छतागृह करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी शहराच्या विकासासाठी स्वयंसेवी नागरिकांची वार्डनिहाय कमिटी तयार केली आहे. शहरातील ३९ वार्डांसाठी स्थापन झालेल्या कमिटीची टप्प्याटप्प्याने बैठक घेतली जात असून आ. शिवेंद्रसिंंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली ८ ते १५ वार्डासाठी स्थापन झालेल्या कमिटीची पहिली बैठक उत्साहात झाली. यावेळी रामदास बल्लाळ, हेमंत कासार यांच्यासह पालिकेचे नगर अभियंता दिलीप चिद्रे, आरोग्य निरीक्षक शिवदास साखरे, दत्तात्रय रणदिवे, भागनिरीक्षक सतीश साखरे, अभियंता प्रदीप साबळे, सुधीर चव्हाण, एस. एस. भावी, संदीप सावंत तसेच वार्ड कमिटी सदस्य उपस्थित होते.
वार्ड कमिटी सदस्यांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या. त्या सोडविण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. रात्रीच्या वेळी सर्व ठिकाणी पथदिवे सुरु राहतील याची दक्षता घेण्याची सूचनाही केली.
स्वच्छतागृहे बांधण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर तुम्ही जागा दाखवा, तिथे स्वच्छतागृह करण्यात येईल. बुधवार पेठेत हौदांची स्वच्छता करुन गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनासाठी या हौदांचा वापर करावा, असे त्यांनी प्रशासनास सांगितले. कामाठीपुरा, कोल्हाटी वस्ती, वैदू वस्ती याठिकाणच्या समस्या मांडल्या. या परिसरात झोपडपट्टी सुधार योजना राबवण्याची मागणी करण्यात आली. मात्र ग्रीन झोन असून झोन उठल्याशिवाय घरकुल बांधकाम करता येत नसल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गोडोली तळ्यामुळे पावसाळ्यात हानी
गोडोली तलावाचे बांधकाम झाल्याने पावसाळ्यात अजिंक्यताऱ्यावरुन खाली येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसून यामुळे गोडोलीत मोठी हानी होत असल्याचा मुद्दा मोरे यांनी मांडला. मात्र हा भाग त्रिशंकू असून पालिकेच्या हद्दीत नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून काय तोडगा काढता येतो का ते पाहू, असे आ. शिवेंद्रसिंंहराजे म्हणाले.
भागनिरीक्षकांनी जबाबदारीने काम करावे
पंचायत समितीसमोर नेपाळी व्यावसायिकांना जागा देण्यात आली असून त्यांनी याठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचे व्यंकटराव मोरे यांनी सांगितले. याबाबत भागनिरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांनी दररोज आपल्या भागात जाऊन पाहणी केली पाहिजे. भागनिरीक्षक जागृत असतील तर चुकीच्या कामांना पाठबळ मिळणार नाही, असे आ. शिवेंद्रसिंंहराजे यांनी स्पष्ट केले.