खासदार अन् कार्यकर्त्यांना जागा दाखवू
By admin | Published: February 1, 2017 11:18 PM2017-02-01T23:18:29+5:302017-02-01T23:18:29+5:30
शिवेंद्रसिंहराजे भोसले : वेचले येथील मेळाव्यात आव्हान; दहशतीला जशासे तसे उत्तर देणार
शेंद्रे : ‘जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत खासदार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दहशतीला न घाबरता घरी बसवून त्यांची त्यांना जागा दाखवून द्यावी. इथून पुढे विरोधकांच्या दहशतीला जशास तसे उत्तर देण्यात येईल, याची दखल आता विरोधकांनी घ्यावीच,’ असे आव्हान आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
वेचले, ता. सातारा येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शेंदे्र गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याचे संयोजन बाबाराजे युवा विचारमंच व सरपंच अनिल देशमुख यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने शिवेंद्रसिंहराजे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘येणारी निवडणूक ही सातारा तालुक्याचे राजकारण ठरविणारी ठरणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कामाला लागावे. मनोमिलन कोणामुळे तुटले आहे ते जनतेला माहीत आहे. शेंद्रे गटात भाऊसाहेब महाराजांपासून आपल्याच गटाचे प्राबल्य आहे. परंतु मनोमिलनात गट त्यांच्याकडे दोन पंचवार्षिकदिला. त्यामुळे शेंद्रे गटातील आपल्या कार्यकर्त्यांचे नेतृत्व खुंटले. त्याला मी जबाबदार आहे.’
दिवंगत भाऊसाहेब महाराजांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात सातारा तालुक्याला किंमत आली. राजकारणात आपण पक्षाशी कायम प्रामाणिक राहिलो आहे. राजकारणातील असणारी तत्व पाळत आलो आहोत. त्यामुळे आता जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचे निर्णय अजिंक्यताऱ्यावर बैठक घेऊन घेण्यात येतात. तिकीट मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. जो निर्णय होईल तो मान्य करावा.’
यावेळी सरपंच अनिल देशमुख, ज्येष्ठ नेते नाना चव्हाण, भोसले, लालासाहेब पवार आदींची मनोगते झाली.
यावेळी सभापती अॅड. विक्रम पवार, लालासाहेब पवार, माजी उपसभापती अरविंद चव्हाण, प्रा. शिवाजीराव चव्हाण नाना चव्हाण, वेचले ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, उपस्थित होते. (वार्ताहर)