मसूरमध्ये सीसीटीव्ही बनलेत शोपीस, केवळ खांबावर भार : दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 03:39 PM2020-11-12T15:39:00+5:302020-11-12T15:40:21+5:30
cctv, karad, sataranews मसूर येथील मुख्य चौकातील सीसीटीव्ही गत अनेक दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थ व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
मसूर : येथील मुख्य चौकातील सीसीटीव्ही गत अनेक दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थ व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
मसूर ही परिसरातील सुमार ४० गावांची मुख्य बाजारपेठ आहे. दररोज येथे लाखो रुपयांची उलाढाल होत असते. परिसरातील हजारो लोकांची विविध कामासाठी येथे ये-जा सुरू असते. त्यातच सध्या दिवाळी सणासाठी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सजवली आहेत. विक्रीसाठी मालही मोठ्या प्रमाणात भरलेला आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे चालू असल्यास त्यांना भीती वाटत नाही. परंतु हे कॅमेरे बंद असल्याने व्यापारी भीतीच्या छायेत आहेत. या चौकातून पाटण-पंढरपूर मार्ग, कऱ्हाड-मसूर मार्ग, कऱ्हाड-किवळ असे मार्ग जात असल्याने याठिकाणी वाहनांची वर्दळ असते. सीसीटीव्हीमुळे सर्व ठिकाणाहून येणाऱ्या वाहनांवर लक्ष राहत होते. मात्र, सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे व्यापारी, ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
दरम्यान, गत चार दिवसांपूर्वी अंतवडी गावच्या शिवारात काही संशयास्पदरीत्या फिरत होते. ग्रामस्थांच्या सतर्कतेने संबंधितांना हकलण्यात आले आहे. विभागात काही दिवसात चोरीच्या घटना घडल्या नसल्या तरी यापूर्वी मुख्य चौकाच्या परिसरातील दुकानेच चोरट्यांनी टार्गेट केली होती. त्यामुळे येथे सीसीटीव्ही असणे अत्यंत आवश्यक आहे.
या चौकातून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. तसेच किरकोळ वादावादीच्या घटना ही या चौकात घडत असतात. तसेच वाहन चोरीच्या घटनाही काहीवेळा घडल्या आहेत. मात्र सीसीटीव्हीमुळे काही घटनांची उकल झाली होती. संबंधित विभागाने येथील सीसीटीव्ही सुरू करून सर्वांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांनी केली आहे.
चाळीस गावांतील ग्रामस्थांची गर्दी
मुख्य चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याबाबत वारंवार तक्रार करूनही हे कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून चालू केलेले नाहीत. सध्या दिवाळीमुळे खरेदीसाठी परिसरातील सुमारे चाळीस गावांतील ग्रामस्थांची गर्दी मसूर चौकात दिसून येते. त्यावरही सीसीटीव्हीचा वॉच असणे आवश्यक आहे.