नीरा-देवघरच्या पाण्यासाठी वाघोशी ग्रामस्थांचे श्रमदान

By admin | Published: May 3, 2017 02:53 PM2017-05-03T14:53:00+5:302017-05-03T14:53:00+5:30

खंडाळा तालुका : प्रशासनाकडून कालव्याच्या कामाला उरक नसल्याने निर्णय

Shramdaan of village residents of Wagoshi for water of Neera-Devghar | नीरा-देवघरच्या पाण्यासाठी वाघोशी ग्रामस्थांचे श्रमदान

नीरा-देवघरच्या पाण्यासाठी वाघोशी ग्रामस्थांचे श्रमदान

Next

आॅनलाईन लोकमत

खंडाळा (जि. सातारा), दि. 03 : नीरा-देवघरच्या पाण्यासाठी डोळे लावून बसलेल्या ग्रामस्थांच्या डोळ्यातून पाणी येण्याची परिस्थिती निर्माण झाली तरी कामाचा उरक नसल्याने वाघोशी ग्रामस्थांनी चक्क कालव्याच्या कामालाच हात घातला. काही करून पाणी मिळवायचेच असा निर्धार करून गावाने एकजुटीने श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. दिवसभर कडक उन्हात पाण्यासाठी घाम गाळला.


नीरा-देवघर प्रकल्पाच्या खंडाळ्यातील कालव्याचे काम गेली अनेक वर्षे संथ गतीने सुरू आहे. वास्तविक, या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाही यापूर्वी मिळालेल्या आश्वासनानुसार नीरा-देवघरचे पाणी मिळाले नाही. पाण्यासाठी ग्रामस्थांना टाहो फोडावा लागत आहे. विशेषत: पूर्व भागातील वाघोशी, कराडवाडी, अंदोरी या तीन गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गत आठवड्यात कालव्याचे काम पूर्ण करून पाणी सोडण्यासाठी ग्रामस्थांनी राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना निवेदन दिले होते. तर आमदार मकरंद पाटील यांनी वाई येथील बैठकीत अपूर्ण पुलाच्या जागी सिमेंट पाईप टाकून तात्पुरते पाणी वाघोशीपर्यंत सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार पाईप आणून काम सुरू झाले. मात्र, मनुष्यबळाअभावी काम होणे अशक्य असल्याने वाघोशी ग्रामस्थांनीच पाईप बसविणे, भरावा घालण्यासाठी मदत केली.


खंडाळा तालुक्यात नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. तालुक्यातील वाघोशीपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आश्वासन दिले होते. त्यानुसार या कालव्याचे काम गतीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे पाणी येणार हे आश्वासन हवेतच विरले. आता या भागातील वाघोशी, कराडवाडी या दोन गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावच्या पाणीपुरवठा विहिरींनी तळ गाठल्याने तीन दिवसांतून एकदाच पाणी मिळते. त्यामुळे मिळेल तेवढ्याच पाण्यात सर्व कामे करावी लागतात. अथवा पाण्यासाठी आसपास तसेच दूरवरच्याही विहिरींवरून महिलांना पाणी घेऊन यावे लागत आहे.


या कालव्याच्या मोर्वे येथील पुलाचे काम अर्धवटच आहे. त्यामुळे पाणी पुढे जाऊ शकणार नाही. या ठिकाणी पुलाच्या दोन स्लॅबच्यामध्ये तात्पुरत्या स्वरुपात सिमेंट पाईप टाकून पाणी गरजेपुरते पुढे नेले जाऊ शकते, हे लक्षात आल्यावर कामाची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आता वाघोशीपर्यंत पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)

या कालव्याचे मोर्वे येथील रखडलेले काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. वाघोशी गावात दरवर्षी पाण्याची समस्या बिकट होत असते. सध्या गावच्या विहिरी आटल्या आहेत. पाण्यासाठी गावाने श्रमदान करायचे ठरवले होते.
- लक्ष्मण धायगुडे,

माजी सरपंच, वाघोशी

Web Title: Shramdaan of village residents of Wagoshi for water of Neera-Devghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.