श्रमिक मुक्ती दलाचे एकाच दिवशी शेकडो गावांत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 04:50 PM2020-10-05T16:50:48+5:302020-10-05T16:52:00+5:30
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे राज्यातील अनेक गावांमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये पंधरा हजार स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला.
सातारा : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे राज्यातील अनेक गावांमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये पंधरा हजार स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला.
हाथरसमधील मुलीवर अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. राज्यसरकार आणि प्रशासन या आरोपींना पाठीशी घालत आहे. तिच्यावर झालेला अत्याचार, त्यानंतर तिची जीभ छाटणे, तिच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या साऱ्या घटना संशयास्पद आहेत, असे या आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.
खरंतर ही घटना केवळ अत्याचाराची नाही तर त्यामागे जातवर्चस्व आणि जातीय अहंकार आहे. तिच्या गुन्हेगारांना शिक्षा होऊन तिला न्याय मिळाला पाहिजे; पण याबरोबरच जातीय आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना थांबायच्या असतील तर उतरंडीची जातीव्यवस्था संपली पाहिजे. तिच्या अंताची चळवळ तीव्र केली पाहिजे, तरच या घटना कायमच्या थांबणार आहेत. म्हणून जाती अंताची चळवळ तीव्र करण्याचा निर्धार श्रमिक मुक्ती दलाने केला आहे.
श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कॉ. संपत देसाई, डॉ. प्रशांत पन्हाळकर, मोहन अनपट, चैतन्य दळवी, डी. के. बोडके, मेजर बन, संतोष गोटल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.