आसू येथील श्री काळभैरवनाथ यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:37 AM2021-05-16T04:37:39+5:302021-05-16T04:37:39+5:30
आसू : आसू येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी कोरोना महामारीच्या कारणास्तव व जिल्हाधिकाऱ्यांच्या नेमून दिलेल्या ...
आसू : आसू येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी कोरोना महामारीच्या कारणास्तव व जिल्हाधिकाऱ्यांच्या नेमून दिलेल्या नियमानुसार रद्द करण्यात आली आहे.
यात्रेचा प्रारंभ रविवार, दि. १६ मे रोजी होत असून, यात्रा उत्सवासाठी हजारोंच्या संख्येने भाविक-भक्त येतात. कोरोना महामारी काळात यात्रा, उत्सव या ठिकाणी होणारी संभाव्य गर्दी पाहता यासाठी यात्रा व उत्सव कार्यक्रमांवर बंदी घातली गेली असल्याने आसू ग्रामपंचायतीने व श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीने प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत यात्रा, उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, परंपरेप्रमाणे सर्व धार्मिक विधी शासकीय नियम पाळत मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आसू ग्रामपंचायतीने व श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी यांनी दिली आहे.
श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सवाला अक्षय्यतृतीया झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून सुरुवात होत असते. पहिल्या दिवशी देवाच्या हळदीचा कार्यक्रम तर दुसऱ्या दिवशी देवाच्या लग्नाचा कार्यक्रम व तिसऱ्या दिवशी देवाचा छबिना अशाप्रकारे यात्रा पार पडत असते. अक्षय्यतृतीया झाल्यानंतर चौथा व पाचवा दिवस हे दोन दिवस यात्रेचे मुख्य दिवस असून, या दोन दिवसांचे मुख्य कार्यक्रम असतील, ते कार्यक्रम मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत पार पाडले जाणार असल्याचे यात्रा कमिटीने व आसू ग्रामपंचायतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
मात्र, यंदा दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली आहे. तरी सर्व भाविक-भक्तांनी दर्शनासाठी मंदिराच्या परिसरात येऊ नये व घरातील देवाला नैवेद्य दाखवावा व देवाच्या लग्नाच्या वेळेत आपल्या घरातून सर्वांनी अक्षदा टाकाव्यात, असे आवाहन आसू ग्रामपंचायतीने व श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीने केले आहे.