पाल येथील खंडोबा यात्रा रद्द, प्रमुख मानकऱ्यांसह पन्नास जणांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 05:49 PM2022-01-11T17:49:33+5:302022-01-11T17:50:05+5:30
यात्रेचा सोहळा यू-ट्यूबवर प्रसारित करण्यात येणार आहे.
उंब्रज : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या कऱ्हाड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबाची १५ जानेवारी रोजी होणारी यात्रा जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली. दरम्यान, खंडोबाचे सर्व धार्मिक विधी, रुढी, परंपरा या स्थानिक पातळीवर खंडोबाचे प्रमुख मानकरी, कारखान्याचे मानकरी अशा फक्त पन्नास जणांच्या उपस्थितीत होणार आहेत. याबाबत प्रांताधिकारी यांनी आदेश काढला आहे.
पाल येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा १५ जानेवारी हा मुख्य दिवस आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मंगळवारी तातडीने बैठक घेतली. यात्रा रद्दचा निर्णय जाहीर केला. या बैठकीस खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड होते. सुरेश पाटील, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच सुनील काळभोर, मंडल अधिकारी युवराज काटे, धनवडे, यात्रा कमिटीचे चेअरमन प्रकाश जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत प्रशासन, विविध संस्थांचे आजी-माजी सर्व पदाधिकाऱ्यांनी यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे तसेच यात्रेचा सोहळा यू-ट्यूबवर प्रसारित करण्यात येणार आहे.
यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक, मानकरी, मानाचे गाडे, सासनकाठी, पालख्या यांच्यासह भाविकांना यात्रेसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. या बैठकीस देवस्थानचे संचालक संजय काळभोर, सर्जेराव खंडाईत, तंटामुक्तीचे संजय गोरे, मंगेश कुंभार, जगन्नाथ पालकर, उत्तम गोरे, सचिन लवंदे, महेश पाटील, संजय गोरे, दिनकरराव खंडाईत, हरीष पाटील आदी उपस्थित होते.
दि. १४ ते १९ जानेवारी अखेर व २३ जानेवारी रोजी श्री खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दि. १४ जानेवारीपासून पाच किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घ्यावी तसेच यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. -अजय गोरड, सहायक पोलीस निरीक्षक