"श्री सेवागिरी महाराज की जय"च्या जयघोषात 'श्री सेवागिरी महाराजां'चा रथोत्सव उत्साहात संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 04:34 PM2022-01-01T16:34:12+5:302022-01-01T16:37:12+5:30
कोरोनाचे नियम पाळत भाविकांना रथाचे दर्शन घेता आल्याने भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले. "श्री सेवागिरी महाराज की जय"च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
पुसेगाव : महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील प. पू. श्री. सेवागिरी महाराजांचा रथोत्सवाचा कार्यक्रम यात्रेचे धार्मिक विधी पूर्वापार प्रथेनुसार आणि रूढी व परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाचे नियम पाळत भाविकांना रथाचे दर्शन घेता आल्याने भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले. "श्री सेवागिरी महाराज की जय"च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, ना. नितीन बानूगडे पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रथपूजन करण्यात आले. याप्रसंगी, मठाधिपती श्री. सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन, विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, रथ व समाधी दर्शनास भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला होता. तसेच पुसेगाव शहर, मंदिरास जोडले गेलेले सर्व रस्ते बॅरिगेट्स लावून पोलीस प्रशासनाने बंद केल्याने वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला.
गेल्या ७४ वर्षे यात्रा सुरू झाल्यापासून सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका ठेवलेला, फुलांनी सजविलेला रथाच्या मिरवणुकीची परंपरा चालत आली आहे. मात्र, सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या साथीमुळे रथ मिरवणुकीसह यात्रेतही खंड पडला आहे.