श्री सिद्धनाथ देवाची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:32 AM2021-05-03T04:32:49+5:302021-05-03T04:32:49+5:30
म्हसवड : ढाकणी, ता. माण येथील श्री सिद्धनाथ देवाची यात्रा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाच्या आदेशानुसार सलग दुसऱ्या ...
म्हसवड : ढाकणी, ता. माण येथील श्री सिद्धनाथ देवाची यात्रा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाच्या आदेशानुसार सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे.
येथील ग्रामदैवत व लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ देवाची ३, ४ मे रोजी होणारी यात्रा रद्द केली आहे. या कालावधीत श्री सिद्धनाथ मंदिर बंद राहणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन समिती व प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
या दोन दिवशी मंदिरात भाविकांसाठी दर्शन बंद असल्याने गर्दी करू नये, असे आवाहन सरपंच दत्ताभाऊ शिंदे यांनी केले आहे.
यात्रेचा सोमवारी पहिला दिवस श्रींच्या रथाची नगरप्रदक्षिणा, सासणकाठी, बगाड, गजीनृत्य दहा गावचे, पालखी सोहळा असतो. तर, दुसरा दिवस भव्य कुस्ती मैदान, तमाशा करमणुकीचे सर्व कार्यक्रम सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द असल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ग्रामस्थांनी व भाविकांनी घरीच राहून यात्राकाळात धार्मिक विधी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामसेवक दिनेश काशिद यांनी केले आहे.
चौकट -
उल्लंघन केल्यास कडक कारवाई
यात्रा कालावधीत मंदिर बंद राहणार आहे. या काळात पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असून प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा म्हसवड पोलिसांनी दिला आहे.