जलयुक्तच्या कामांचे ‘ड्रोन’मधून चित्रीकरण!
By admin | Published: January 22, 2017 11:37 PM2017-01-22T23:37:07+5:302017-01-22T23:37:07+5:30
यशोगाथा पुस्तक रुपात : क्यू आर कोडच्या संकल्पनेतून मोबाईलवरही चित्रफित
सातारा : महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला सातारा जिल्ह्यात प्रचंड मोठे यश आले आहे. लोकसहभागातून झालेल्या या कामांची यशोगाथा जिल्हा प्रशासनाच्या वतीने यशोगाथा सांगणारे पुस्तक प्रसिद्ध केले असून, या पुस्तकात ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जलयुक्त शिवार कामांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेल्या कामाच्या माध्यमातून १.३ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा निर्माण केला आहे. याचा सविस्तर आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
प्रशासकीय उपक्रम, जलसंधारण, विविध उपचार, भरलं शिवार आणि तांत्रिक माहिती अशा चार विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या यशस्वी कामांची माहिती या पुस्तकामध्ये सचित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासकीय उपक्रमामध्ये प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रक्रिया, अभियान, प्रत्यक्ष श्रमदान याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
जलसंधारण विविध उपचारांमध्ये यांत्रिकी विभागाने केलेल्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. भरलं शिवार या विभागात या अभियानाचा दृश्य परिणाम पाहायला मिळतो. विविध गावांच्या यशोगाथांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
तांत्रिक माहिती या शेवटच्या विभागात जलसंधारणांच्या विविध उपचारांची तांत्रिक माहिती देण्यात आली आहे. या चारही विभागांच्या माध्यमातून अपेक्षित समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जलसंधारण विभागाचे तत्कालीन सचिव प्रभाकर देशमुख, सचिव आबासाहेब जऱ्हाड, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या संकल्पनेतून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
या यशोगाथेचे संपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे. तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, तत्कालीन उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमण, ग्रामविकास विभागाचे उपसचिव वैभव राजेघाडगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय पाटील, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश भोसले यांच्या सहकार्याने ही पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
काय आहे
क्यू आर कोड ?
जलयुक्तचे काम छायाचित्रांसोबतच चित्रफितीच्या माध्यमातून पाहता यावे, म्हणून ‘क्यू आर कोड (क्विक रिस्पाँस कोड)’ चा वापर या पुस्तकात प्रामुख्याने करण्यात आला आहे. क्यू आर कोडची संकल्पना शासकीय प्रकाशनामध्ये राबविणारे राज्यात बहुधा हे एकमेव पुस्तक ठरेल. क्यू आर कोड रिडरच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाईलवर झालेल्या कामांची चित्रफितही पाहू शकता, हे या पुस्तकाचे प्रमुख आकर्षण आणि वेगळेपण आहे.