भक्तिमय वातावरणात श्रीराम रथोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:48 PM2019-11-27T23:48:20+5:302019-11-27T23:48:48+5:30

फलटण : संस्थान काळापासून सुरू असलेली येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा यावर्षीही फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो ...

Shriram Rathotsav in devotional environment | भक्तिमय वातावरणात श्रीराम रथोत्सव

भक्तिमय वातावरणात श्रीराम रथोत्सव

googlenewsNext

फलटण : संस्थान काळापासून सुरू असलेली येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा यावर्षीही फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत परंपरागत पद्धतीने मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. दरम्यान, रथ प्रदक्षिणेच्या मार्गावर शहरवासीयांनी रथमार्गावर सडारांगोळ्या घालून प्रभू श्रीरामाचे स्वागत केले.
नाईक-निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी सुमारे २५० वर्षांपूर्वी रथयात्रेची सुरू केलेली परंपरा आजही परंपरागत पद्धतीने सुरू आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते. बुधवारी सकाळी आठ वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन झाले. त्यानंतर प्रभू श्रीराम, सीता मातेच्या मूर्ती रथामध्ये ठेवून त्यांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.
फळे, फुले, पाने आणि विविधरंगी निशाणे लावून उसाच्या मोळ्या बांधून सजविलेला हा रथ नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. श्रीराम मंदिरापासून नगर प्रदक्षिणेसाठी निघालेल्या या रथाचे शिंपी गल्लीतून बारामती चौकमार्गे नगरपरिषद कार्यालयासमोरील चौकात आगमन झाले. यावेळी नगरपालिकेच्यावतीने नगराध्यक्षा नीता नेवसे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, आरोग्य समितीचे सभापती अजय माळवे, पाणी पुरवठा सभापती ज्योत्स्ना शिरतोडे, नगरसेविका सुवर्णा खानविलकर, अधिकार व कर्मचाऱ्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.
त्यानंतर रथयात्रा ज्ञानेश्वर मंदिर, गोविंद महाराज उपळेकर मंदिर, डेक्कन चौक, महात्मा फुले चौक, मारवाड पेठ मार्गाने बारस्कर चौक, रंगारी महादेव मंदिरापासून बाणगंगा नदीपात्र, मलटण भागातील सद्गुरू हरिबुवा मंदिरापासून फिरत गजानन चौक या मार्गाने सायंकाळी पुन्हा श्रीराम मंदिरासमोरील रथखाण्यात पोहोचला. यावेळी राजघराण्यातील विश्वजितराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार हनुमंत पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप पोमन पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा धुमाळ यांच्यासह राजघराण्यातील मानकरी व भाविक उपस्थित होते.

Web Title: Shriram Rathotsav in devotional environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.