फलटणला श्रीराम रथोत्सव उत्साहात
By सचिन काकडे | Published: December 13, 2023 08:13 PM2023-12-13T20:13:39+5:302023-12-13T20:13:55+5:30
हजारो भाविकांची हजेरी : सोहळ्याला परंपरेची किनार.
फलटण : संस्थान काळापासून सुरू असलेला येथील श्रीराम रथोत्सव अर्थात फलटणची सुप्रसिद्ध रामयात्रा बुधवारी मोठ्या उत्साहात व परंपरेनुसार पार पडली. फलटणसह विविध भागांतील हजारो श्रीराम भक्तांनी या सोहळ्यासाठी फलटनगरीत हजेरी लावली.
नाईक-निंबाळकर राजघराण्यातील साध्वी सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी सुमारे २८० वर्षांपूर्वी राम रथयात्रेची परंपरा सुरू केली असून, ती आजही सुरू आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता राजघराण्यातील मान्यवरांच्या हस्ते रथाचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर, प्रभू श्रीराम, सीता मातेच्या मूर्ती रथामध्ये ठेवून त्यांची विधीवत पूजा व आरती करण्यात आली.
फळे, फुले, पान आणि विविधरंगी निशाणे लावून, उसाच्या मोळ्या बांधून सजविलेला हा रथ नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. या सोहळ्याचा शुभारंभ राजघराण्यातील संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ.जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्यासह भाविक व मानकरी उपस्थित होते. भाविकांच्या सुरक्षेसाठी शहरात कडेकोड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.