श्रीराम मंदिर सांस्कृतिक राजधानी बनेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:42 AM2021-01-16T04:42:02+5:302021-01-16T04:42:02+5:30
सातारा : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने अयोध्या येथील मंदिर निर्माणासाठी निधी संकलन अभियान सुरू होणार आहे. हे मंदिर जगातील ...
सातारा : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने अयोध्या येथील मंदिर निर्माणासाठी निधी संकलन अभियान सुरू होणार आहे. हे मंदिर जगातील सांस्कृतिक राजधानी बनेल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी व्यक्त केला.
सातारा येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परांडे म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र शासनाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली. न्यासाच्या विनंतीवरून पंतप्रधानांनी दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी श्री राम जन्मभूमीच्या जागी भूमिपूजन व शिलापूजन केले. प्रस्तावित मंदिर तीन मजल्यांचे असेल. प्रत्येक मजल्याची उंची २० फुटांची असेल. मंदिराची एकूण उंची १६१ फूट असेल, लांबी ३६० फूट आणि रूंदी २३५ फूट असेल. त्यावर पाच शिखरे असतील. हे मंदिर २.७ एकर जागेवर होईल. त्याचे संपूर्ण बांधकाम केवळ दगडांचे असेल. सिमेंट व लोखंडाचा वापर यात होणार नाही.
मंदिर उभारणीसाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या विनंतीवरून १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत निधी समर्पण अभियान देशभर राबविले जात आहे. या माध्यमातून देशातील चार लाख गावे तसेच ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले आहे. आर्थिक पारदर्शिता राहावी म्हणून राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने पावती पुस्तके व कूपन्सची रचना करून त्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात हे अभियान दिनांक १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत होणार आहे, अशी माहितीही परांडे यांनी दिली.