शाडूच्या मूर्तींबरोबरच स्वनिर्मितीचा श्रीगणेशा!
By admin | Published: September 3, 2016 11:22 PM2016-09-03T23:22:42+5:302016-09-04T00:34:41+5:30
‘लोकमत’ चळवळीला व्यापक स्वरूप : यंदा हजारो घरांमध्ये होणार बाप्पांच्या पर्यावरणपूरक मूर्र्तींची प्रतिष्ठापना
सातारा : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘लोकमत’ने उभ्या केलेल्या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. हजारो सातारकरांनी यंदा थेट कुंभारांकडे शाडूच्या मूर्तींचे बुकिंग केले असून, शेकडो नागरिकांनी स्वत:च्या घरी मूर्ती निर्माण करण्याचे प्रशिक्षणही घेतले आहे.
अनेकांनी संमती दर्शविली असली तरी प्रत्यक्षात मात्र स्पर्धात्मक युगात शाडू मातीचे गणपती मिळणे दुर्मीळ आहे. यासाठी इनरव्हील क्लब आॅफ सातारा चॅम्प तर्फे भरविण्यात आलेल्या गणेशोत्सवात शाडूच्या मूर्ती बनविण्याच्या एकदिवसीय शिबिरात वायसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बुद्धीचा देवता समजल्या जाणाऱ्या गणपती शाडूच्या मातीने तयार करून समाजासमोर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन केले आहे.
गणेशोत्सवात घरोघरी गणेशमूर्ती बसविण्याचे लगबग सर्वत्र सुरू आहे. नागरिकांना शाडू मातीचे गणपती उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने इनरव्हील क्लब आॅफ सातारा चॅम्पने एकदिवसीय शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ६५ विद्यार्थ्यांसह १० शिक्षक, ५ महिलांचा सहभाग होता. या सर्वांनी मिळून आकर्षक अशा ७५ शाडूच्या मूर्ती बनविल्या आहेत. पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती कशी बनवितात, यासाठी हे शिबिर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवण्यात आली होती.
एकूण या शिबिरात ६५ मूर्ती बनविण्यात आल्या. क्लबमार्फत पाच पोती शाडू मातीही उपलब्ध करून मूर्ती तयार केले. (प्रतिनिधी)
एका गणपतीसाठी शंभर रुपयांचा खर्च...
बाजारात मिळणाऱ्या किमती गणपतीपेक्षा स्वत: बनविलेल्या शाडू मातीचे गणपती तयार करण्यासाठी साधारणत: १०० रुपये खर्च येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी येणाऱ्या गणेशोत्सवासाठी स्वत:च्या हाताने बनविलेल्या गणपती बसवू, असा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केली. इनरव्हील क्लबतर्फे नैसर्गिक रंग कसे वापरायचे याचेही प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी क्लबच्या मनीषा पाटील, लीना कदम, वैशाली पाटील यांनी मार्गदर्शन केले.
शाडू मातीची तयार केलेला गणपती घरीच बादलीत विसर्जन करता येते. त्यातील रंग विरघळ्यानंतर माती तसीच राहते आणि त्या मातीचा वापरही झाडांबरोबर पुन्हा खेळणी वगैरे बनविण्यासाठी करता येतो.
- गीता मामनिया,
पीडीसी, इनरव्हील क्लब सातारा
‘लोकमत’च्या प्रबोधनाचे अभिनंदन
मागील दोन वर्षांपासून ‘लोकमत’ पर्यावरणपूरक मूर्ती बसविण्याचे आवाहन केले होते. या माध्यमातून निसर्गावर होणाऱ्या परिणामांविषयी देखील प्रबोधन केले होते. त्यानंतर अनेक नागरिक शाडूमातीच्या मूर्तीची मागणी करू लागले असून, या दोन वर्षांत २०० वरून आता हजारावर ही संख्या पोहोचली आहे. तर अनेकजणांनी शाडूमातीचीच मूर्ती हवी असल्याचे सांगून बाजारात उपलब्ध करावी, अशी मागणीदेखील विक्रेत्यांकडे केली आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.