कॅनॉल ते कॉलेजपर्यंत पादचारी मार्ग दुरवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:38 AM2021-04-18T04:38:44+5:302021-04-18T04:38:44+5:30
ओगलेवाडी : कृष्णा कॅनॉल ते कॉलेज रस्त्याकडेला असलेल्या पादचारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी कठडे ...
ओगलेवाडी : कृष्णा कॅनॉल ते कॉलेज रस्त्याकडेला असलेल्या पादचारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी कठडे ढासळले आहेत. तसेच त्याखालील नाल्यातील सांडपाणीही रस्त्यावरून वाहत आहे. सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच कृष्णा कॅनॉलपासून बनवडीपर्यंतचा रस्ताही दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
तांबवे फाट्यापासून रस्त्याची अवस्था दयनीय
तांबवे : तांबवे फाटा ते तांबवेपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्ता धोकादायक बनला आहे. तांबवे येथे नवीन पूल सुरू करण्यात आला आहे. मात्र, या मार्गावर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. रस्त्यातील खड्ड्यांवर संबंधित ठेकेदाराने तात्पुरती मलमपट्टी केली आहे. सध्या खडी उखडून पूर्वीपेक्षा मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
प्रवासी थांबा शेड उभारणे गरजेचे
कऱ्हाड : तालुक्यात कऱ्हाड-ढेबेवाडी मार्ग ते कऱ्हाड-पाटण मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या कामात संबंधित विभागाने एसटी थांबा प्रवासी शेड हटविलेले आहेत. पावसाळ्यात शाळेतील विद्यार्थी व नागरिकांना उघड्यावर उभे राहून एसटी गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रवासी शेड हटविलेले आहेत. अशा ठिकाणी तत्काळ शेड उभारण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
ढेबेवाडी मार्गावर धोकादायक वळण
कुसूर : मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यापासून ते ढेबेवाडीपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळण आहेत. या वळणांपैकी शिंंदेवाडी येथील वळण जास्त धोकादायक असल्याने या ठिकाणी रात्री अपघात होत आहेत. या वळणावरून भरधाव वाहनांवरील चालकांचा ताबा सुटून वाहने नजीकच्या ओढ्यात जात आहेत.
महामार्ग परिसरात रसवंतीगृहात वाढ
कऱ्हाड : उन्हाचा तडाखा बसत असल्यामुळे कऱ्हाड-पाटण रस्त्यावर दुकानदारांनी अनेक ठिकाणी रसवंतीगृहे थाटली आहेत. वारुंजी, वसंतगड, साकुर्डी आदी मुख्य मार्गावर दुकाने थाटली गेली आहेत.
मोकाट गायींमुळे नुकसान
तांबवे : तालुक्यातील विंग, शिंदेवाडी, येणके, पोतले, तांबवे परिसरात मोकाट गायींकडून तसेच इतर जनावरांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. परिसरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांच्याकडून शिवारात घुसून बागायत पिकांचे नुकसान होत आहे. सध्या शिवारात उसाचे पीक जोमात आले आहे. मात्र, मोकाट जनावरे शिवारात घुसून उसाची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
साइडपट्ट्यांची दुरवस्था झाल्याने अपघात
कोपर्डे हवेली : कऱ्हाड-मसूर मार्गावरील रस्त्याकडेला असलेल्या पट्ट्या ठिकठिकाणी खचल्या आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. खचलेल्या साइडपट्ट्यांवरून दुचाकी वाहने जात असताना वाहन चालकाचा तोल जाऊन अपघात होत आहेत. रस्त्याच्या साइडपट्ट्या भरण्याची मागणी प्रवाशांसह वाहनधारकांतून केली जात आहे.