कार्वे-कोरेगाव रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:20+5:302021-01-09T04:32:20+5:30
कार्वे-कोरेगाव रस्ता वर्षानुवर्षे दुर्लक्षित होता; पण पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या रस्त्याला मंजुरी मिळाली आणि या रस्त्याचे भाग्य उजळले. तत्कालीन ...
कार्वे-कोरेगाव रस्ता वर्षानुवर्षे दुर्लक्षित होता; पण पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या रस्त्याला मंजुरी मिळाली आणि या रस्त्याचे भाग्य उजळले. तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील आणि आ. बाळासाहेब पाटील यांनी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न केला होता. २००५ मध्ये हा रस्ता झाला; पण संबंधित ठेकेदाराने या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे फारसे गांभीर्याने लक्ष घातले नाही. काही ठिकाणी तर मोऱ्यांची कामेही त्यांनी अपुरीच ठेवल्याच्या तक्रारी त्यावेळी ग्रामस्थांमधून झाल्या होत्या. दरम्यान, रस्त्याची देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने तीन वर्षांच्या आतच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. ते वेळेत मुजविले न गेल्याने हे खड्डे विस्तारत गेले. खड्ड्यांची संख्या वाढली. मध्यंतरी कोरेगावमध्ये झालेल्या वाळू लिलावामुळे या रस्त्यावरून वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात झाली. क्षमतेपेक्षा अवजड वाहने या रस्त्यावरून धावू लागली. दिवस -रात्र वाळूची वाहतूक झाली. यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते.
या वाहनांमुळे कार्वे हद्दीत थोरात वस्ती येथील रस्ता मोठ्या प्रमाणात खचला. त्यामुळे या मार्गावरील एसटीची वाहतूक काही दिवस बंद ठेवण्यात आली होती. खचलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टीचे काम करण्यात आले.
- चौकट
वाहनचालकांची कसरत, तर विद्यार्थ्यांचे हाल
या रस्त्यावर शेतकरयांनी शेतीच्या पाईपलाईनसाठी रस्त्यावर ठिकठिकाणी चरी पडल्या, त्याही व्यवस्थित भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हा रस्ता खड्डेमय झाला आहे. परिणामी, या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहेच; पण कोरेगावहून शाळेसाठी चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही प्रचंड हाल होत आहेत.