महाबळेश्वरच्या जंगलात पांढऱ्या शेकरूचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 12:51 PM2024-11-09T12:51:16+5:302024-11-09T12:51:40+5:30
महाबळेश्वर (जि. सातारा) : येथील तहसील कार्यालयाशेजारी महाबळेश्वर येथील भूमिअभिलेख कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या नरक्या जातीच्या झाडाचे फळे खाताना नागरिकांना ...
महाबळेश्वर (जि. सातारा) : येथील तहसील कार्यालयाशेजारी महाबळेश्वर येथील भूमिअभिलेख कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या नरक्या जातीच्या झाडाचे फळे खाताना नागरिकांना पांढऱ्या रंगाच्या शेकरूचे (खार) दर्शन झाले.
महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू अर्थातच शेकरा या नावाने परिचित आहे. खार म्हटली की, इटुकली पिटुकली, गोंडस झुपकेदार शेपूट इकडे तिकडे उडवत तुरुतुरु पळणारा प्राणी आपल्या नजरेसमोर येतो. पण, शेकरू खारीच्या ह्या वर्णनाच्या अगदी उलट आहे. शेपटीसकट साधारण तीन ते साडेतीन फूट लांबीची ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे.
पांढऱ्या रंगाच्या शेकरुंचे डोळे गुलाबीसर तर संपूर्ण पांढरे असल्याचे दिसून आले. इंग्रजीमध्ये शेकरूस ‘इंडियन जायंट स्क्विरल’ नावाने ओळखले जाते. येथील एमटीडीसीमध्ये अशाच प्रकारचे एक पांढरे शेकरू दिसून आले होते. खारीपेक्षा आकाराने मोठी असणारी खार म्हणजे शेकरू, महाबळेश्वर परिसरामध्ये शेकरू मोठ्या प्रमाणावर आढळतात.
अनेकदा वन्यप्राण्यांमध्ये मेलानीनच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग अर्धवट पांढरा किंवा पूर्ण पांढरा होत आहे. दुर्मीळ अशा पांढऱ्या शेकरूचे दर्शन क्वचितच होते. महाबळेश्वर येथील तहसील भागात झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारताना गुुरुवारी पुन्हा पांढऱ्या शेकरूचे दर्शन झाले.