कोयना नदीत पुन्हा मगरीचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 05:57 PM2023-01-02T17:57:07+5:302023-01-02T17:57:45+5:30
वन विभागाने ठोस पावले उचलून दुर्घटना घडण्यापूर्वी मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी
कोयनानगर : कोयनानगर परिसरातील कोयना नदी परिसरात मगरीचा वावर कायम असून मारूल गावच्या पैलतीरी कोयना नदी किनाऱ्यावर पुन्हा दुसऱ्यांदा सुमारे पाच फुटांची मगर दिसून आली आहे. मासे मारणाऱ्यांना ही मगर दिसून आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने ठोस पावले उचलून दुर्घटना घडण्यापूर्वी मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यात कोयनानगर विभागातील कुसवडे गावानजीक कोयनानदीच्या पात्रालगत उघड्यावर पाच फुटांची मगर आढळून आली होती. स्थानिक शेतकरी जनावरे चारण्यासाठी नदीच्या परिसरात गेला होता. जनावरे चारत असताना त्याला नदीच्या काठावर मोठी मगर दिसून आली होती. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र फिरल्यानंतर कोयना वन्यजीव विभागाकडून संबंधित ग्रामपंचायतीला पत्र देऊन नदीपात्रात न जाण्याबाबत इतर सूचना केल्या होत्या.
त्यानंतर पुन्हा शनिवारी कोयना विभागातील मारूल गावानजीक कोयना नदीपात्रात मासे मारण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांना नदीकाठावर मगर दिसून आली. कोयना नदीपात्रालगत अनेक लोकवस्ती असून महिला कपडे धुण्यासाठी, शेतकरी जनावरे चारण्यासाठी व मुले आंघोळ करण्यासाठी नदीपात्रात सातत्याने जात असतात.
शेतकरीही शेतीपंप सुरू व बंद करण्यासाठी तसेच शेताला पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जात असतात. तसेच नदीपात्रात मासेमारी करण्यासाठीदेखील येथील लोक दररोज जात असतात. त्यांच्या जीवाला या मगरीमुळे धोका निर्माण होऊ शकतो. कोयना नदीपात्रात सतत मगरीचा वावर असल्याचे निष्पन्न झाल्याने परिसरातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने याची गांभिर्याने दखल घेऊन मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.