साताऱ्यात ‘हुडेड ग्रासहॉपर’चे दर्शन, सह्याद्रीत आजही अस्तित्व टिकवून
By सचिन काकडे | Published: June 10, 2024 02:07 PM2024-06-10T14:07:53+5:302024-06-10T14:16:26+5:30
परिसंस्थेचा महत्त्वपूर्ण घटक
सचिन काकडे
सातारा : सातारा जिल्ह्याला समृद्ध वनसंपदा लाभली असून, हजारो पशू-पक्षी येथे वास्तव्य करतात. ‘हुडेड ग्रासहॉपर’ हा त्यातील एक छोटासा जीव. आकर्षक रंगसंगती, पाठीवर उंचवटा, त्यावर पिवळ्या रंगाची पट्टी, पांढरे डोळे यामुळे तो अधिकच सुंदर भासतो. या दुर्मीळ कीटकाचे नुकतेच ठोसेघर परिसरात दर्शन घडले असून, तो आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.
हुडेड ग्रासहॉपर हा एक कीटकवर्गीय प्राणी आहे. पानांशी एकरूप होणारा रंग अन् पाठीवरील उंचावट्यामुळे त्याला इंग्रजीत ‘हुडेड ग्रासहॉपर’ असे नाव ठेवण्यात आले आहे. याचे शास्त्रीय नाव ‘टेराटोड्स मॉन्टिकोलीस’ असून या कुळातील कीटकांना हुडेड ग्रासहॉपर म्हणून ओळखले जाते. हा गवतटोळ्यांचा एक वंश आहे जो भारत आणि श्रीलंका येथे आढळतो. हुडेड ग्रासहॉपर गवताळ प्रदेश तसेच वन परिसंस्थेचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे.
हुडेड ग्रासहॉपर हा तसा दुर्मीळ कीटक आहे. बहुतांश ठिकाणी याचा अधिवास आढळतो. पानांशी एकरूप होणारा रंग व पाठीवरील उंचवट्यामुळे तो सर्वांत वेगळा ठरतो. हा कीटक टेराटोड्स मॉन्टिकोलीस असून, याविषयी भारतातील काही संशोधक संशोधन करीत आहेत. - अमित सय्यद, कीटक संशोधक