प्रवेशासाठी ससेहोलपट !
By Admin | Published: July 2, 2016 11:57 PM2016-07-02T23:57:08+5:302016-07-02T23:57:08+5:30
वाई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आॅनलाईन प्रवेशप्रकिया बारगळली
कवठे : शासकीय व खासगी आयटीआयच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची व्यवस्था व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली असली तरी या आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रकियेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.
ही प्रक्रिया २४ जूनच्या दरम्यान सुरू होणार होती. काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली व त्याची जाहिरात करण्यात आली होती. ही प्रक्रिया २७ जूनपासून नव्याने सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. प्रक्रिया सुरू झालीही; पण त्यामध्ये असंख्य अडथळे येऊ लागले. सुरुवातीला विद्यार्थ्यांची नोंदणी होत नव्हती तर गेले चार दिवस सर्व आॅनलाईन माहिती दिल्यानंतर पासवर्ड द्या व पासवर्ड तपासा, अशी सूचना येत होती.
या दोन्ही ठिकाणी पासवर्ड दिला असता व नोंदणी प्रक्रिया निश्चित करा या बटणावर क्लिक केल्यानंतर पासवर्ड द्या, अशी माहिती स्क्रीनवर दाखवली जात आहे. या पानाला दोन मिनिटांत प्रतिसाद न दिल्यास आपण या प्रक्रियेतून बाहेर पडाल, अशा प्रकारची सूचना वजा माहिती संगणकाच्या पडद्यावर दाखविली जाते आहे. एकदा पासवर्ड दिल्यानंतर पुन्हा पासवर्ड द्या, असा संदेश संगणकाच्या पडद्यावर आल्यानंतर विद्यार्थ्यांना काहीच करता येत नाही.
या प्रक्रियेमध्ये संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारे दुरुस्ती करण्यात आली नसून, याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. थोड्या-थोड्या कालावधीने विद्यार्थी आॅनलाईन फॉर्म भरण्याचा
प्रयत्न करीत असून, यामध्ये त्यांच्या वेळेचा व पैशाचा नाहक अपव्यय होत आहे. एकीकडे नोंदणीसंदर्भात पूर्ण माहिती नसल्याने व कागदपत्रांची जुळवणी करताना विद्यार्थ्यांची व पालकांचीही धावपळ होत
असल्याने या प्रक्रियेतून कधी एकदा नोंदणी करून मुक्तता होतेय असेच पालकांसह विद्यार्थ्यांना वाटत आहे. (वार्ताहर)
रात्री दोन-तीन वाजताही फॉर्म भरण्यासाठी धडपड
एकाच वेळी सगळीकडे फॉर्म भरले जात असल्याने सर्व्हरवर लोड असेल व त्यामुळे आपला फॉर्म भरला जात नाही, असा समज होऊन काही विद्यार्थी रात्रीचे जागे राहून सायबर कॅफेमध्ये जाऊन हे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु सध्या ही प्रक्रिया पूर्ण होत नाही.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महाविद्यालयात प्रवेश मिळेपर्यंत प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. त्यातच आॅनलाईन यंत्रणेतील बिघाडामुळे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे. सलग तीन तास घालवूनही संबंधित पान सुरू झाले नाही, त्यामुळे एक-एक दिवस वाया जात आहे. यावर तातडीने उपाय करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.
- गजानन गायकवाड, पालक