कार्पेटसह सिलकोट रस्ता होणार चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:34 AM2021-01-17T04:34:00+5:302021-01-17T04:34:00+5:30
मलकापूर : कराड- ढेबेवाडी मार्गाची आगाशिवनगर हद्दीत चाळण झाली होती. अनेकवेळा मुरुम-खडी टाकून खड्डे बुजवूनही काहीही उपयोग झाला नाही. ...
मलकापूर :
कराड- ढेबेवाडी मार्गाची आगाशिवनगर हद्दीत चाळण झाली होती. अनेकवेळा मुरुम-खडी टाकून खड्डे बुजवूनही काहीही उपयोग झाला नाही. याबाबतचे वृत्त अनेकवेळा ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली.
आगाशिवनगर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याऐवजी डांबरीकरणाचेच काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे. सध्या कार्पेट रस्ता होत असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर शिवछावा चौक ते महिला उद्योग परिसरात सततच्या पावसामुळे मोठे खड्डे पडले होते. बांधकाम विभागाने दोनवेळा तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र, त्याचा काहीच टिकाव लागला नाही. उलट खड्ड्यांमध्ये भरलेली खडी रस्त्यावर आल्याने गाड्या घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. रात्रीच्या वेळी प्रवास करताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत होती. दोन वेळा या रस्त्याचे काम झाले. मात्र, हे काम समाधानकारक नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. तातडीने रस्त्यांची डागडुजी व्हावी, तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून झाली होती. तर खड्ड्यांबाबतचे वृत्त अनेकवेळा लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने कऱ्हाड- ढेबेवाडी मार्गाच्या आगाशिवनगर परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू केले आहे. यावेळी रस्त्याचे कार्पेटसह सिलकोट दोन थराने डांबरीकरण होत असल्यामुळे बांधकाम विभागाचे नागरिकांसह वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.