श्री खंडोबा-म्हाळसा मूर्तींसाठी चांदीचे सिंहासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:06 PM2017-12-17T23:06:04+5:302017-12-17T23:06:55+5:30
उंब्रज : ‘महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाल, ता. कºहाड येथील श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्तींसाठी भाविकांच्या मदतीतून सात लाख रुपये किमतीचे चांदीचे सिंहासन बनविण्यात आले आहे,’ अशी माहिती मार्तंड देवस्थानचे अध्यक्ष व कºहाड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील यांनी दिली.
श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्तींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक पाल येथील मंदिरात हजेरी लावतात. दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच आहे. आराध्य दैवत म्हणून श्री खंडोबाकडे पाहिले जाते. येथे येणारे भाविक हे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार श्री खंडोबासाठी वस्तू रुपाने सोने, चांदी तसेच वेगवेगळ्या वस्तू दान करीत असतात. यात रोख रकमेचाही समावेश असतो. येथे अर्पण केलेल्या चांदीपासून श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्तीसाठी चांदीचे सिंहासन करण्यात आले आहे. यामध्ये ४ लाख ४६ हजार रुपये किमतीची ११ किलो चांदी, १ लाख ६७ हजार रुपये किमतीचे ६६ किलो पितळ आणि जवळपास ७५ हजार रुपये किमतीचे सागवानाचे लाकूड वापरून सुमारे ६ लाख ९० हजार रुपये किमतीचे आकर्षक असे सिंहासन तयार करण्यात आले आहे.
श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्तींच्या दोन्ही बाजूस पितळपासून दोन सिंह तयार करण्यात आले आहेत. या सिंहासनावरील चांदी व पितळवर कलाकुसर करण्यात आली आहे. त्याचे काम कोल्हापूर येथील विजय तांबट यांनी केले आहे. सागवानी लाकडावरील कलाकुसरीचे काम पाटण येथील अरविंद कुंभार यांनी केले आहे. सर्वांच्या प्रयत्नातूनच चांदीचे आकर्षक असे सिंहासन साकार झाले आहे. यामुळे श्री खंडोबा मंदिराच्या वैभवात भर पडली आहे, असेही देवराज पाटील यांनी सांगितले.
उपाध्यक्ष रघुनाथ खंडाईत, संचालक संजय काळभोर, उत्तम गोरे, दीपक दीक्षित उपस्थित होते.
भाविकांचे
आकर्षण राहणार...
लवकरच यात्रा सुरू होत आहे. तर दि. ३१ डिसेंबर रोजी श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पाल नगरीत संपन्न होत आहे. यावर्षी प्रथमच श्री खंडोबा व म्हाळसा यांची मूर्ती चांदीच्या सिंहासनावर पाहण्यास भाविकांना मिळणार आहे. यावर्षी यात्रेत चांदीचे सिंहासन हे भाविकांचे आकर्षण ठरणार आहे.