जनावरांचे बाजार बंद असल्याने व्यापाऱ्यांची चांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:38 AM2021-05-14T04:38:29+5:302021-05-14T04:38:29+5:30
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील ऊसतोड कामगार सात महिन्यांनंतर परराज्यातून गावी परतले असून, आर्थिक तडजोड करण्यासाठी प्रत्येकवर्षी कारखान्यावरून परतल्यानंतर शेळ्या, ...
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील ऊसतोड कामगार सात महिन्यांनंतर परराज्यातून गावी परतले असून, आर्थिक तडजोड करण्यासाठी प्रत्येकवर्षी कारखान्यावरून परतल्यानंतर शेळ्या, म्हैस, बैल विकून आर्थिक अडचणी सोडवतात; मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावोगावी भरणारे जनावरांचे बाजार बंद आहेत. त्यामुळे शेळ्या, म्हैस, बैल आदी जनावरे विकायची कुठे? असा प्रश्न ऊसतोड मजुरांसमोर उभा राहिला. मंदीत संधी शोधणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांची चांदी झाली आहे.
गरजू मजुरांची अडवणूक करून व्यापारी त्यांना वाटेल त्या किमतीत जनावरे खरेदी करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने राज्यभरात निर्बंध लादले आहेत. संचारबंदी लागू असून, आठवडी बाजार, जनावरांचे बाजार बंद आहेत. यामुळे जनावरांची खरेदी-विक्री बंद आहे. आर्थिक अडचणी असलेल्या लोकांना पशुधन विक्रीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत. पशुधन विकणारे स्वतः होऊन दारात येत असल्याने अतिशय कमी दरात व्यापारी मागणी करतात. म्हैस, बैल, शेळ्या घेताना अतिशय कमी दरात घेतात; मात्र एखाद्या स्थानिक शेतकऱ्याला पशुधनाची खरेदी करायची झाल्यास, त्याला मात्र अव्वाच्या सव्वा किंमत सांगतात.
साखर कारखान्यावरून परतलेल्या मजुरांना आर्थिक तडजोड करून संसार चालविण्यासाठी पशुधन विकायचे आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी जोडधंदा म्हणून जनावरे खरेदी करायची आहेत. मात्र दोघांनाही स्वतः होऊन व्यापाऱ्यांकडे जावे लागत आहे. यात व्यापाऱ्यांची चांदी होत असून, ऊसतोड मजूर आणि शेतकरी या दोघांचीही आर्थिक लूट होताना निदर्शनास येत आहे. कोरोना कधी संपणार? आणि बाजार कधी सुरू होणार? याबद्दल काहीच निश्चित नसल्यामुळे डोळ्यासमोर होणारी लूट गरजवंतांना निमूटपणे सहन करावी लागत आहे. तालुक्यातील म्हसवड, तर माण तालुक्याच्या पूर्व भागाच्या सरहद्दीवर असणाऱ्या आटपाडीला जनावरांचा बाजार भरतो; मात्र सध्या कोरोनामुळे सर्वत्र जमावबंदी असल्याने, बाजार बंद असल्याने, व्यापाऱ्यांकडून गरजवंतांची आर्थिक कोंडी होत आहे.
कोट
व्यापाऱ्यांची मनमानी
साखर कारखान्यांवर ऊसतोडणीस जाताना आम्ही शेळ्या, म्हैस आदी जनावरे खरेदी करतो आणि कारखान्यावरून परतल्यानंतर गरजेपोटी जनावरांची विक्री करून पैसे रिकामे करतो. मात्र सध्या बाजार बंद असल्याने, जनावरे विक्री करणे कठीण झाले आहे. व्यापारी स्वतःची मनमानी करीत त्यांना हव्या त्या भावात जनावरे खरेदी करत आहेत. यामुळे आर्थिक नुकसान आम्हालाच सहन करावे लागत आहे.
- रमेश बनसोडे,
ऊसतोडणी मजूर, वरकुटे-मलवडी.