साध्या ड्रेसआड दडली वर्दी!
By admin | Published: May 4, 2016 10:41 PM2016-05-04T22:41:21+5:302016-05-05T00:07:28+5:30
ओळख लपविण्याचा प्रयत्न : दंड टाळण्यासाठी पोलिसांची शक्कल
सातारा : खाकी वर्दीला आता कायद्याचा ‘अभिनव’ आर्थिक फटका बसल्यामुळे वर्दी नको; पण दंड आवरा, अशी अवस्था पोलिस कर्मचाऱ्यांची झाली आहे. या दंडापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी वर्दीवर दुसरा शर्ट चढवून आपली ओळख लपवत नियमांचे उल्लंघन करण्याचा नवा फंडा कर्मचाऱ्यांनी पाडला आहे.
सातारा पोलिस ठाण्यात सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काही पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी असल्यामुळे सामान्यांच्यापेक्षाही अधिक दंड भरलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना वाहतूक नियमांचे पालन करणे म्हणजे डोकेदुखी वाटत आहे.
दुचाकीवर येणाऱ्या वाहतूक पोलिसांना दिवसभर हेल्मेट कुठे ठेवायचा हा प्रश्न सतावतो, तर जवळचाच प्रवास करायचा आहे, मग तेवढ्यासाठी सीट बेल्ट कशाला लावा, असा कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. वास्तविक शहरातील रस्ते आणि त्यावरील गर्दीचा विचार केला तर सरासरी २० ते ३० या गतीने चारचाकी आणि तीस ते चाळीसच्या गतीने दुचाकी धावते. अशात मोठा अपघात होणं किंवा शारीरिक इजा होणं केवळ असंभव आहे, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
वाहतुकीचे नियम पोलिसांनी पाळून सामान्यांसमोर आदर्श ठेवावा, अशी अपेक्षा वरिष्ठांची आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना हे नियम पाळणे बंधनकारक आहे. ‘मोडेन पण वाकणार नाही’ या उक्तीतील पोलिस कर्मचाऱ्यांना अजूनही हे नियम पाळणे पचनी पडेना. यावर उपाय म्हणून त्यांनी खाकी वर्दी दिसणार नाही याची आयडिया शोधून काढली. काही पोलिस ठाण्यातून बाहेर पडताना सामान्यांसारखा शर्ट किंवा जर्किन वर्दीवरून चढवून खाकी वर्दीची ओळख लपविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची पोलिस कर्मचारी असल्याची ओळख लपल्यामुळे पुढचे सगळेच अनर्थ टळत आहेत.
सामान्य शर्टमध्ये चुकून वाहतूक पोलिसांनी पकडले तर त्याला तातडीने आपली खरी ओळख सांगून तिथून दंड न देता सटकण्याचा मार्गही काहींनी अवलंबला आहे. (प्रतिनिधी)