‘तुझे गीत गाण्यासाठी’ सातारकर आतुरलेलेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2015 10:32 PM2015-12-30T22:32:42+5:302015-12-31T00:26:29+5:30

पाडगावकरांच्या जाण्याने हळहळ : पावसातल्या आठवणी जाग्या

'To sing your song' Satararkar! | ‘तुझे गीत गाण्यासाठी’ सातारकर आतुरलेलेच!

‘तुझे गीत गाण्यासाठी’ सातारकर आतुरलेलेच!

Next

सातारा : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असं सांगत कवी मंगेश पाडगावकरांनी श्रोत्यांच्या मनावर जणू गारुड केलं. अशा या ज्येष्ठ कवींचं बुधवारी पहाटे निधन झालं अन् साताराभेटीच्या त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. दीड वर्षांपूर्वी ‘तुझे गीत गाण्यासाठी’ ते साताऱ्यात आले होते. भर पावसातही पाडगावकरांना ऐकण्यासाठी तुडुंब गर्दी झालेली. जणू त्यांच्या काव्यसौंदर्यानं सातारकरांना मोहिनी घातली होती. आताही त्याच कविता ऐकण्यासाठी सातारकर आतुरलेलेच आहेत!पुण्याचे विद्याधर रिसबूड आणि सातारा येथील राजेश जोशी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा शाहूपुरी यांनी दि. १४ जून २०१३ रोजी शाहू कलामंदिरात ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हा कार्यक्रम घेतला होता. त्यात पाडगावकरलिखित गीतांचे सादरीकरण झाले. स्वत: पाडगावकरांनी आपल्या कविता खास शैलीत म्हटल्या होत्या. बाहेर धो-धो पाऊस कोसळत असतानाही सातारकरांनी पाडगावकरांना ऐकण्यासाठी गर्दी केली होती.शाहुपुरी मसाप शाखेचे खजिनदार विनोद कुलकर्णी यांनी मंगेश पाडगावकरांच्या आठवणी जाग्या केल्या. ते म्हणाले, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या कार्यक्रमादिवशी सकाळीच पाडगावकर साताऱ्यात हजर होते. त्यामुळे दिवसभर आणि रात्री जेवतानाही त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारता आल्या. त्यावेळी त्यांचं वय ८४ वर्षांचं होतं. पण वयाचं अंतर न ठेवता त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. (प्रतिनिधी)


मुलाखतीतून उलगडला काव्य लेखनाचा प्रवास
या कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या मुलाखतीत पाडगावकरांनी सातारा ऐतिहासिक भूमीबद्दल पहिल्यापासून आकर्षण असल्याचे बोलून दाखविले होते. शूरवीरांच्या या भूमीत यायची फार इच्छा होती, तो योग आता ‘तुझे गीत गाण्यासाठी’च्या निमित्तानं आल्याचेही या मुलाखतीतून सांगितले होते. पाडगावकरांनी आपल्या काव्य लेखनाचा प्रवास उलगडला होता. पहिली कविता वयाच्या १४ व्या वर्षी केल्याचे सांगून ही काव्यप्रतिभा आपल्या आईकडून आल्याचेही बोलून दाखविले होते. माझी आई उत्तम काव्यवाचन करत. तिच्याकडूनच काव्यनिर्मितीचं बी माझ्यात रुजलं, अशा अनेक आठवणींचा पट त्यांनी सातारकरांसमोर उलगडून दाखविला होता..
साताऱ्याला दुसऱ्यांदा भेट
काही वर्षांपूर्वी नगरवाचनालयातील एका कार्यक्रमासाठी मंगेश पाडगावकर साताऱ्यात आले होते. त्यावेळी पाहुणे म्हणून ते आले होते. मात्र त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे २०१३ मध्ये ते दुसऱ्यांदा ‘तुझे गीत गाण्यासाठी’च्या निमित्ताने साताऱ्यात आले अन् त्यांना समोर बसून ऐकण्याची संधी सातारकरांना लाभली.

Web Title: 'To sing your song' Satararkar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.