एकेरीचा बार अन् वाहनधारक बेजार..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:19 PM2019-07-09T23:19:23+5:302019-07-09T23:19:28+5:30
सचिन काकडे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेरपेटरच्या कामामुळे पोलीस अधीक्षकांकडून शहरात एकेरी ...
सचिन काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेरपेटरच्या कामामुळे पोलीस अधीक्षकांकडून शहरात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीची समस्या मिटण्याऐवजी त्यात आणखीनच भर पडू लागली आहे. हाकेच्या अंतरावर जाण्यासाठी वाहनधारकांना वळसा घालून जावे लागत आहे. हा निर्णय तूर्तास रद्द करावा, अशी मागणी वाहनधारक, व्यापाऱ्यांमधून होऊ लागली आहे.
आठ रस्ते एकत्र जोडणाºया पोवई नाक्यावर गेल्या दीड वर्षापासून ग्रेड सेरपरेटरचे काम सुरू आहे. हे काम सुरू झाल्यापासून शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढल्याने वाहनधारकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे ही परवड सुरू असताना शहरात पुन्हा एकदा एकेरी वाहतुकीच्या निर्णयावर अंमलबजावणी करण्यात आली आहे.
ग्रेड सेपरटरमुळे वाहनधारक हैराण झाले असतानाच एकेरी वाहतुकीमुुळे त्यात आणखीनच भर पडली आहे. सध्या पोलीस मुख्यालय ते पाचशे एक पाटी, शेटे चौक ते कमानी हौद, शनिवार चौक ते देवी चौक, मोती चौक ते पोलीस मुख्यालय या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणाचे काम केले जात असले तरी या निर्णयामुळे अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत आहे. अंतर्गत रस्ते अरुंद असून एकाचवेळी दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा सुरू झाली आहे. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून, वादावादीचे प्रकार घडत आहेत.
...तोवर निर्णय रद्द करावा
ग्रेड सेपरटेर व भुयारी गटार योजनेमुळे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसामुळे रस्त्यातील खड्ड्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या समस्येमुळे सातारकर त्रस्त झाले असताना आता एकेरी वाहतुकीमुळे अनेक समस्यांना सोमोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण होईपर्यंत एकेरीचा नियम रद्द करण्यात यावा, अशी प्रतिक्रिया व्यापारी तसेच वाहनधारकांमधून उमटत आहे.