प्रत्येक जिल्ह्यात सिंघम अवतरणार; दहाव्या मिनिटाला पोलीस मदत मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:38 AM2021-05-23T04:38:49+5:302021-05-23T04:38:49+5:30

सातारा : पोलीस व ‘१०० नंबर’ हे समीकरण आता हद्दपार होणार असून त्याऐवजी ११२ क्रमांक आता सर्वांना लक्षात ठेवावा ...

Singham will appear in every district; Police will get help in the tenth minute! | प्रत्येक जिल्ह्यात सिंघम अवतरणार; दहाव्या मिनिटाला पोलीस मदत मिळणार!

प्रत्येक जिल्ह्यात सिंघम अवतरणार; दहाव्या मिनिटाला पोलीस मदत मिळणार!

Next

सातारा : पोलीस व ‘१०० नंबर’ हे समीकरण आता हद्दपार होणार असून त्याऐवजी ११२ क्रमांक आता सर्वांना लक्षात ठेवावा लागणार आहे. राज्य पोलीस दलानुसार सातारा जिल्हा पोलीस दलात ‘डायल ११२’ चे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या काही दिवसांत ते ‘अ‍ॅक्टिव्हेट’ होणार आहे. दरम्यान, कंट्रोल रूमध्ये ३ स्क्रीन, पीसीआर व्हॅनमध्ये एमडीटी मशीन राहणार असून हायटेक यंत्रणेमुळे आमूलाग्र बदल होणार आहेत.

राज्य पोलीस दल अधिक गतिमान होण्यासाठी ‘महाराष्ट्र इमरजन्सी रिस्पॉन्स’ अर्थात ‘एमईआर’ संकल्पना राबवली जात आहे. या एमईआर संकल्पनेतून प्रत्येक जिल्हास्तरावर नागरिकांच्या ज्या तक्रारी तसेच माहितीचा निपटारा करण्यासाठी डायल ११२ सुरू होत आहे. पोलीस दल व कंट्रोल रूम म्हणजे १०० नंबर हे समीकरण बनले आहे. एरव्ही कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांना काही माहिती द्यायची झाल्यास तसेच तक्रार करायची झाल्यास १०० क्रमांक डायल केला जायचा. नागरिकांनी फोन केल्यांतर कंट्रोल रूममधून त्याची माहिती घेऊन त्यावर पुढील कार्यवाहीसाठी त्या त्या पोलीस ठाण्यांना तसेच पीसीआर व्हॅनला सांगितले जात असे.

कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आता काही तक्रार द्यायची झाल्यास किंवा माहिती द्यायची झाल्यास डायल ११२ नंबरवर डायल करावे लागणार आहे.

यासाठी ७ पोलीस व त्यावर १ सुपर वायझर २४ तास उपस्थित असणार आहेत. आलेला मेसज पाहून त्यानुसार कंट्रोल रूममधून तो मेसेज त्या त्या एमडीटी अर्थात मोबाइल डेटा टर्मिनेटरकडे पाठवला जाणार आहे. एमडीटी हे मशीन जिल्ह्यातील प्रत्येक पीसीआर व्हॅनमध्ये सोबत असणार आहे. इथे हद्दीचा विषय येणार नाही. कारण जे वाहन अर्थात एमडीटी मशीन उपलब्ध राहणार आहे त्याला सूचना मिळणार आहेत.

हा सर्व तांत्रिक विषय असल्याने संबंधित पीसीआर व्हॅन नेमकी कुठी आहे? मेसेज पास झाल्यानंतर ते निघाले आहेत? की नाही? कुठपर्यंत पोहोचले आहेत? हे सर्व कंट्रोल रूममध्ये दिसणार आहे.

पीसीआर व्हॅन तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी कोणती कार्यवाही केली, याचा फीडबॅक घेऊन ज्या व्यक्तीने कॉल केला आहे त्यांनादेखील फीडबॅक दिला जाणार आहे. माहिती मिळाल्यानंतर कमीत कमी १५ मिनिटांमध्ये पीसीआर व्हॅन तेथे पोहोचणे बंधनकारक असणार आहे.

पूर्वीप्रमाणे जसे आपण फोन करून माहिती द्यायचो त्याच पद्धतीने माहिती, तक्रार करायची आहे. अनेकदा आपण माहिती देत असताना आपले नाव गोपनीय ठेवावी, अशी अपेक्षा असते. त्यानुसार आपण कॉल केल्यानंतर तसे सांगितल्यास फोन करून माहिती देणाराचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. दरम्यान, एमडीटी मशीन हे मोबाइलसारखेच छोटे राहणार आहे. त्या मशीनद्वारेच पीसीआर व्हॅन, कंट्रोल रूम संपर्कात राहणार आहे. याशिवाय नियमित फोनचा देखील वापर होणार आहे.

चौकट : दोन हजार पोलिसांना प्रशिक्षण

डायल ११२ चे राज्यात ठिकठिकाणी काम सुरूदेखील झाले आहे. सध्या सातारा पोलिसांचे डायल ११२ चे प्रशिक्षण सुरू असून जिल्ह्यातील सुमारे दोन हजार पोलिसांना याचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. प्रशिक्षणाचा टप्प्पा निम्म्याहून अधिक झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. दरम्यान, डायल ११२ चे रूमचे युनिट स्वतंत्र व अद्ययावत राहणार आहे. सातारचे डायल ११२ च्या जागेची चाचपणी सुरू आहे.

चौकट : कॉल येताच कळणार लोकेशन

तुम्ही डायल ११२ केल्यानंतर तो कॉल थेट नवी मुंबई किंवा नागपूर सेंटरला जाणार आहे. इथे तंत्रज्ञानामुळे तो कॉल कुठून आला आहे, हे समजणार आहे. इथे तुमची तक्रार घेऊन तांत्रिक प्रक्रियेद्वारे ती माहिती त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाठवली जाणार आहे. यासाठी जिल्हा कंट्रोल रूममध्ये ३ स्क्रीन ८ कॉम्प्युटर उपलब्ध असणार आहेत.

चौकट: पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा

पूर्वी सार्वजनिक ठिकाणी किंवा घरांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यानंतर अनेक जण तात्काळ १०० नंबर डायल करत होते. मात्र, आता या नंबरऐवजी ११२ नंबर डायल करावा लागणार आहे. हा नंबर नागरिकांनी लक्षात ठेवून आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगातून सहीसलामत सुटण्यासाठी या नंबरचा वापर करावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

चौकट : नवीन वाहनांचा ताफा

लोकांनी डायल ११२ नंबरवर तक्रार केल्यानंतर संबंधित ठिकाणी तात्काळ पोहोचण्यासाठी पोलिसांना नवीन वाहनांचा ताफा देण्यात आला आहे. यामध्ये तीस दुचाकी व बारा चारचाकी वाहनांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.

जिल्ह्यातील पोलीस ठाणे- ३२

पोलीस अधिकारी- १५६

पोलीस कर्मचारी- २८३९

Web Title: Singham will appear in every district; Police will get help in the tenth minute!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.