मनोरुग्ण महिलेकडून बहिणीची हत्या
By admin | Published: March 24, 2017 12:15 AM2017-03-24T00:15:26+5:302017-03-24T00:15:26+5:30
वडिलांवरही हल्ला : स्वत:लाही संपविले; एकसरमध्ये खळबळ
पसरणी : एकसर येथे मनोरुग्ण महिलेने मोठ्या बहिणीचा गळा चिरून खून केला. यावेळी आलेल्या वडिलांवरही हल्ला करून त्यांनाही गंभीर जखमी केले. त्यानंतर संबंधित महिलेने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केली. सीमा विशाल गायकवाड (वय ३५) व हेमा अरविंद कळंबे (३६) असे मृत बहिणींची नावे आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. घटनास्थळ व पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, अरविंद पांडुरंग कळंबे (५८) हे एकसरमध्ये पत्नीसह राहतात. त्यांना हेमा, सीमा व रिमा अशा तीन मुली आहेत. त्यातील सीमा व रिमा यांचा विवाह झाला असून, सीमा पाचगणी येथे तर रिमा सागर शिंदे (३२) या पुणे येथे असतात. सीमाचे मानसिक संतुलन बिघडल्याने ती दोन वर्षांपासून उपचारासाठी वडिलांबरोबर एकसर येथे राहात होती. तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून औषधोपचार सुरू होते. सीमा व हेमा दोघीही गुरुवारी (दि. २३) रोजी सकाळी एकत्र धुणे धुण्यासाठी कालव्यावर गेल्या होत्या. त्यानंतर दोघींनी घरी येऊन स्वयंपाक केला. दरम्यान, वडील अरविंद कळंबे हे शेजारील शेतात कांदे काढण्यासाठी गेले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक आरडाओरडा ऐकू आल्याने त्यांनी घराकडे धाव घेतली. घरात येऊन पाहिले असता हेमा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. यावेळी सीमाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या उजवा दंड व पोटरीवर सुऱ्याने वार केले. प्रसंगावधान राखून ते घराबाहेर पळून आले. घराचा दरवाजा बाहेरून बंद करून गावकऱ्यांकडे धाव घेतली. गावातील लोकांसोबत पुन्हा घराकडे आल्यावर त्यांना सीमानेही गळा चिरून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पुतण्या विशाल कळंबे याने अरविंद कळंबे यांना उपचारासाठी वाई ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अरविंद कळंबे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक विनायक वेताळ करीत आहेत. (वार्ताहर) घरी कोणीच नसताना घटना सीमाची आई पुणे येथील रिमा यांच्या घरी गेल्या होत्या. तसेच चुलते कोंडिराम कळंबे हेही कुटुंबीयांसह अचानक पुण्यास गेले होते. त्यामुळे घरी दोघी बहिणी व वडील असे तिघेच होते. त्यात घर शेतात असल्याने आसपासही कोणी नव्हते.