शिवघोषानं दुमदुमला सातारा

By admin | Published: February 19, 2015 10:29 PM2015-02-19T22:29:01+5:302015-02-19T23:45:56+5:30

जिल्ह्यात शिवजयंती साजरी : चौकाचौकांत उत्साहाला उधाण; ऐतिहासिक चित्ररथ अन् शाही मिरवणुकीने वेधले लक्ष

Siva Ghoshan Dumdumum Satara | शिवघोषानं दुमदुमला सातारा

शिवघोषानं दुमदुमला सातारा

Next

सातारा : छत्रपती शिवाजी महराजांची जयंती सातारा शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली. शहरातील प्रत्येक पेठेत अन् प्रत्येक चौकात शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. अवघी तरुणाई जयंती उत्सवासाठी झटत होती. स्पीकरवर छत्रपतींच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जात होते. भगव्या पताकांची तोरणं लावून अन् झेंडे उभारून पेठा सजविल्या होत्या. अशा भारावलेल्या वातावरणात ठिकठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ‘हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी सातारा शहर व जिल्हा दुमदुमून गेला. (प्रतिनिधी) शिवतीर्थ निघाला उजळून शिवजयंतीनिमित्त पोवई नाका येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी शिवतीर्थ विद्युतरोषणाईने उजळून निघाले होते. दिवसभर विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. राजवाड्यास आकर्षक विद्युतरोषणाई येथील जुन्या राजवाड्यास पालिकेने आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी संपूर्ण राजवाडा एखाद्या तेजपुंजाप्रमाणे चमकत होता. राजवाडा गांधी मैदान येथील सोमण स्मारक या ठिकाणी शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. याठिकाणी केलेली सजावट नेत्रदीपक होती. शिवप्रतिमेची पूजा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिनाज शेख, सभापती, नगरसेवक आदींच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सातारकर उपस्थित होते. लक्षवेधक ऐतिहासिक चित्ररथ गांधी मैदान येथून सायंकाळी शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध शाळांनी जिवंत ऐतिहासिक देखावे, शिवरायांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. या चित्ररथांचे फोटो अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये काढले. यामध्ये विद्यार्थ्यांनी पोवाडे, नाटिका सादर केल्या. ही मिरवणूक राजपथावरून पावई नाक्यापर्यंत काढण्यात आली. शिवाजी उदय मंडळाने शिवरायांची मूर्ती पालखीत ठेवून वाजतगाजत शहरातून मिरवणूक काढली. यामध्ये युवकांचा मोठा सहभाग होता. बालगोपाळांमध्ये उत्साह शहरात ठिकठिकाणी बालगोपाळांनी शिवाजी महाराजांच्या छोट्या मूर्ती स्थापन करून सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या. त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी करून शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. ढोल, लेझीम पथकांचा सहभाग मिरवणुकीत मध्यभागी ढोल, लेझीम पथकांनी आपली कला सादर केली. पथकात मुलींचाही सहभाग होता. ही मिरवणूक पाहण्यासाठी राजपथावर सातारकरांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Siva Ghoshan Dumdumum Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.