वजीर सुळक्यावर साताऱ्याची आरोही, फक्त ३० मिनिटात सर केला सुळका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 11:39 AM2021-11-18T11:39:56+5:302021-11-18T11:40:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याजवळ असलेला वजीर हा सुळका सर करणाऱ्यांच्या टीममध्ये साडेसहा वर्षीय आरोही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याजवळ असलेला वजीर हा सुळका सर करणाऱ्यांच्या टीममध्ये साडेसहा वर्षीय आरोही सचिन लोखंडेचा समावेश होता. आरोहीने हा सुळका फक्त ३० मिनिटात सर केला. जरा तालुक्यातील कामेरी या गावच्या या धाडसी मुलीचे कौतुक होत आहे.
गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वांत अवघड असलेला २८० फूट उंच वजीर सुळका सातारच्या दहा जणांच्या टीमने रविवारी दोन तासांच्या खडतर प्रयत्नांनंतर वजीरचा पायथ्याशी पोहचले.
पॉइंट ब्रेक अडव्हेंचर ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली राजधानी ट्रेकिंग ग्रुपच्या सदस्यांनी सरत्या वर्षाला निरोप देत ही अवघड कामगिरी केली.
शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारी ही मोहीम सातारकरांच्या ग्रुपसाठी अविस्मरणीय ठरली. बुद्धिबळाच्या पटावर जसा वजीर मांडावा तसा हा सुळका दिमाखात उभा आहे. नजर टाकली तरी अंगाला दरदरून घाम फोडणारा हा सुळका सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते.
पॉइंट ब्रेक अॅडव्हेंचर ग्रुपचे जाॅकी साळुंके, चेतन शिंदे, समिर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राजधानी ट्रेकर्सचे सचिन लोखंडे, राहुल घाडगे, नवनाथ घाडगे, भरत घाडगे, संतोष निकम, अनुजा निकम, संदिप भिंगारदिवे, अक्षय पोळ, अजय गडांकूश सातारच्या दहा जणांनी ही मोहीम फत्ते केली.
वांद्रे या गावापासून या मोहिमेला रविवारी पहाटे सुरुवात झाली. अंगाला झोंबणारा पहाटेचा गारवा आणि समोर वजीर सुळका हे दोन्ही आव्हाने पेलत या ग्रुपने अतिशय शिस्तबद्ध चढाई केली. जसजसे सुळक्यावर जात होते, तसतसा सुळका अधिक चिंचोळा होत जातो. साधारण रात्री नऊच्या सुमारास ही मोहीम फत्ते झाली.
आरोही उपजतच धाडसी आहे. वजीर सुळका चढतांना तिने असेच धाडस दाखवले. सायकलिंग पोहणे हे देखील तिला आवडते. तिची लहान बहीण प्रज्ञादेखील आपल्या बहिणीकडून धाडस घेतले आहे. मुलींना सोबत घेऊन भविष्य काळामध्ये अनेक मोहिमा आखल्या आहेत. -सचिन लोखंडे, आरोहीचे पालक