बिबट्याच्या हल्ल्यात सहा जनावरांचा मृत्यू
By admin | Published: July 6, 2014 11:24 PM2014-07-06T23:24:00+5:302014-07-06T23:27:25+5:30
सातारा तालुक्याच्या पश्चिमेस परळी खोऱ्यात
परळी : सातारा तालुक्याच्या पश्चिमेस परळी खोऱ्यातील केळवली पठारावरील केळवली, सांडवली, दत्तवाडी, मुऱ्हा येथे चार दिवसांपासून दबा धरून बसलेल्या बिबट्याने सहा जनावरांवर हल्ला केला. यामध्ये पाच शेळ्या व एका गायीचा मृत्यू झाला.
केळवली येथील किरण कोंडिबा कोकरे, कोंडिबा बाबूराव कोकरे यांच्या शेळ्या शुक्रवारी तीन वाजता अकराते पायटे शिवारात चरत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. शेळ्या ओरडल्याने किरण कोकरे त्याठिकाणी आले व आरडाओरड केली. तोपर्यंत बिबट्याने शेळ्या ठार केल्या होत्या.
दत्तवाडी येथे भीमा राजाराम जानकर यांच्या गायीवरही बिबट्याने हल्ला केला. यामुळे गाय जखमी झाली. काही वेळानंतर जखमी गायीचा मृत्यू झाला. धोंडिबा महादेव जानकर यांनी शेतात शेळ्या चरायला नेल्या होत्या. जानकर हे झाडाखाली आराम करत असताना बिबट्याने हल्ला करून तीन शेळ्या गायब केल्या.
ग्रामस्थांनी शेळ्यांचा शोध घेतला; परंतु वारस गावच्या दिशेने जंगलातून जाण्याच्या रस्त्यावर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनांमुळे गुऱ्हाख्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)