साताऱ्यात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, 2 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 08:48 AM2019-07-31T08:48:32+5:302019-07-31T10:51:55+5:30
पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत.
सातारा - पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील काशीळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर चालक आणि लहान मुलगी जखमी झाले आहेत. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याने अपघात झाला. कर्नाटक राज्यातील धारवाड येथील कुटुंबातील सदस्यांचा या अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला, एक लहान मुलगा आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. मुजावर हे प्रसिद्ध फुलांचे व्यापारी होते.
निजामुद्दीम मुजावर असे कुटूंब प्रमुखाचे नाव असून कोल्हापूर मार्गे ते मुंबईकडे निघाले असता चालकाला झोप आली. त्यामुळे रात्री 1.30 च्या सुमारास गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. झायलो गाडीतून हे कुटुंबीय कोल्हापूरहून मुंबईकडे आणि पुढे हज यात्रेस जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त गाडीचा क्रमांक KA 25 M C 4359 असा आहे. जखमींना सिव्हिल हॉस्पिटल सातारा या ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आले आहे.