कोयनेचे सहा दरवाजे एक फुटाने उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:31 PM2017-09-20T13:31:24+5:302017-09-20T13:45:30+5:30
सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाºया कोयना धरणात पाण्याची आवक अधिक होत असल्याने सहा वक्र दरवाजे बुधवारी सकाळी एक फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामधून ९ हजार २९७ प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पायथा वीजगृहही सुरू करण्यात आले आहे. तेथूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीपात्रात एकूण ११ हजार ३९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे, अशी माहिती देण्यात आली.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. सध्या धरणात २० हजरांहून अधिक क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यातच धरणाची पाणीपातळी १०४.३० टीएमसी आहे.
धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी सकाळी सवा नऊच्या धरणाचे मुख्य सहा वक्र दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले. त्यामधून प्रति सेकंद ९ हजार २९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर सकाळी साडे दहाच्या सुमारास पायथा वीजगृहही सुरू करण्यात आले आहे. या वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या नदीपात्रात दोन्ही ठिकाणचा मिळून ११ हजार ३९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सध्या कोयना व परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे सायंकाळी आढावा घेऊन धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे कोयना धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.