सहा अभियंत्यांच्या कुटुंबात अशिक्षित वारकरीच कारभारी !

By admin | Published: January 7, 2016 10:44 PM2016-01-07T22:44:51+5:302016-01-08T01:09:38+5:30

कोपर्डे हवेली : तुपेंच्या एकत्रित कुटुंबात मिळतेय तीन पिढ्यांना आत्मिक समाधान

Six engineers family uneducated warrior steward! | सहा अभियंत्यांच्या कुटुंबात अशिक्षित वारकरीच कारभारी !

सहा अभियंत्यांच्या कुटुंबात अशिक्षित वारकरीच कारभारी !

Next

शंकर पोळ -- कोपर्डे हवेली --कुटुंब एकसंध ठेवण्यासाठी कारभारी कसा असावा. यापासून एकत्रित कुटुंबाची सुरुवात होत असते. आजच्या काळात एकत्रित कुटुंबपद्धतीचा ऱ्हास होत असताना या उलट आजही काही अपवादात्मकच मोठी कुटुंबे ग्रामीण भागात एकत्रितपणे गुण्यागोविंदाने संसार करत असलेली पाहावयास मिळतात. असे एक कुटुंब सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथे आहे. उत्तम बापू तुपे यांचे तीन पिढ्यांचे कुटुंब आजही एकत्रित पद्धतीने गुण्यागोविंदाने नांदत आहे. या कुटुंबातील लोकांचे एकत्रित राहणे तसेच साठ वर्षांपासून दर महिन्याला पंढरपूरची वारी करणारे घरातील लोक इतरांना आदर्श ठरणारे असे आहे.कोपर्डे हवेली येथील दिवंगत बापू विठू तुपे यांच्या पत्नी मथुबाई तुपे यांना चार मुले आहेत. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यामुळे पहिला मुलगा उत्तम यांचे शिक्षण झाले नाही. इतर भावंडांनी कसेतरी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. मात्र, स्वत: अशिक्षित राहून आपल्या भावांवर चांगले संस्कार उत्तम तुपे यांनी केले. घरची ३० गुंठे शेतजमीन असल्याने त्यातून भावंडांना सोबत घेऊन शेती करत इतर व्यवसायही करून आपले कुटुंब चालविण्याचे काम उत्तम तुपे यांनी केले. काम करत असताना प्रत्येक भावंडांना कामे वाटून देत त्यांच्याकडून शेती केली जात आहे. त्यांच्याकडून ऊस व माळव्याची पिके दरवर्षी घेतली जातात. तसेच शेतीपूरक दुग्धव्यवसायही केला जातो.शेतीलाच आपले सर्वस्व मानत संपूर्ण कुटुंब हे शेतीक्षेत्रात आज मोठ्या कष्टाने काम करत आहे. स्वत: ची शिकण्याची इच्छा पूर्ण झाली नसल्याने आपल्या वाट्याला आलेला अशिक्षितपणा हा आपल्या पुढच्या पिढीला भोगावा लागू नये म्हणून स्वत:च्या मुलांबरोबर भावांच्या मुलांचीही शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत त्यांना उच्चशिक्षित केले.
तंबाखू, मिश्री असे कोणतेच व्यसन कुटुंबातील महिला तसेच पुरुष सदस्यांना नाही. कुटुंबातील निम्म्याहून अधिक लोक माळकरी आहेत. साठ वर्षांपासून आजही कुटुंबातील सदस्यांनी पंढरपूरच्या वारीची परंपरा जपली आहे. एकूण लहान मोठ्यांसहीत वीस लोक या कुटुंबात राहतात. उत्तम स्वत: अशिक्षित असून, संपूर्ण कुटुंबाचे कारभारी आहेत. या कुटुंबात एकूण सहा इंजिनिअर असून, काही नोकरी करत आहेत.
घरातील स्त्रियांची संख्या ही आठ असून, त्यांचे सर्व प्रश्न, अडीअडचणी कुटुंबप्रमुख म्हणून उत्तम तुपे यांच्या पत्नी बाळूताई तुपे या सोडवतात. कुटुंबातील पुरुष मंडळींच्या बरोबर कुटुंबातील स्त्रियांही काम करत आहेत. उत्तम तुपे यांचे पूर्वीचे जमिनीचे वडिलोपार्जित तीस गुंठे क्षेत्र होते.


‘भगवंतां’कडून बंधुंच्या मुलांनाही प्रोत्साहन
उत्तम तुपे यांना त्यांच्या स्वभावामुळे भगवंत असे म्हणतात. नम्रता हा त्यांचा गुण सर्वांना आवडतो. सध्या ते सह्याद्री कारखान्यामध्ये काम करत आहेत. शिक्षण घेत असताना स्वत: मुलांबरोबरही आपल्या भावाच्या मुलांनाही त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे आज कुस्ती, क्रिकेट खेळांमध्येही मुलांनी नाव कमविले आहे. गावातील एक मनमिळावू आणि अध्यात्माची आवड असलेल्या उत्तम तुपे यांच्या स्वभावामुळे त्यांना लोक ‘भगवंत’ असेही गावातील लोक म्हणतात.
असे आहे ‘तुपेंचं’ कुटुंब
उत्तम तुपे यांच्या पत्नी बाळूताई, त्यांना दोन मुले व दोन सुना आणि एक नातू आहे. तर मुलगा संदीप, पत्नी शुभांगी आणि मुलगा राघव असे आहे. तर दुसरा मुलगा राजेंद्र याची पत्नी प्रियंका आहे. तुपेंचे दुसरे बंधू बाळासाहेब तुपे यांच्या पत्नी उषाताई यांची सागर व सुहास ही दोन अविवाहित मुले आहेत. तुपेंचे तिसरे बंधू पैलवान जयसिंग तुपे यांच्या पत्नी शीला यांचीही अजय व अक्षय ही दोन अविवाहित मुले आहेत. तुपेंचे चौथे बंधू मानसिंग तुपे व पत्नी संगीता यांना प्रगती व प्रतीक्षा दोन मुली असून प्रद्युम्न हा मुलगा.


एकत्रित कुटुंबात राहण्याचा आनंद हा वेगळाच असतो. कारभारी नि:स्वार्थी असला की, आपोपच सर्व घरातील मंडळी आदर्श घेऊन काम करतात. एकीच्या बळामुळे कुटुंबाची प्रगती करता येते. त्यातून आत्मिक समाधान मिळते.
- उत्तम तुपे, कुटुंबप्रमुख

Web Title: Six engineers family uneducated warrior steward!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.