कऱ्हाडात सहा अर्ज अवैध !
By admin | Published: November 2, 2016 11:52 PM2016-11-02T23:52:16+5:302016-11-02T23:52:16+5:30
कऱ्हाड पालिका निवडणूक : २४१ उमेदवार अर्जांची झाली छाननी; नगराध्यक्षपदाचे चौदाही अर्ज वैध
कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी पार पडली. अर्ज छाननीमध्ये नगराध्यक्षपदासाठी असणारे सर्वच्या सर्व १४ अर्ज वैध ठरले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तीन, शिवसेनचा एक तर दोन अपक्षांचे अर्ज अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किशोर पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
येथील पालिकेची निवडणूक दि. २७ नोव्हेंबर रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी पालिकेत तयार करण्यात आलेल्या निवडणूक कक्षात अर्जांची छाननी झाली. नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या २१८ उमेदवारांची पहिल्यांदा छाननी झाली. त्यात सहा अर्ज अवैध ठरले त्यानंतर नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या चौदा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
सकाळी अकरा वाजता अर्ज छाननी प्रक्रियेस प्रारंभ झाला. प्रभागनिहाय उमेदवारांना बोलवून छाननीची प्रक्रिया पार पडली. दुपारी अडीच नंतर नगराध्यक्ष
पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची छाननी पूर्ण झाली. अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवार, दि. ११ नोव्हेंबरपर्यंतची मुदत असून, त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)
जनशक्तीची पहिली विकेट
सर्वच्या सर्व प्रभागांत उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा डांगोरा पिटलेल्या जनशक्ती आघाडीची बुधवारी छाननीमध्ये पहिली विकेट गेली. प्रभाग एकमधून जनशक्तीच्या वतीने दाखल केलेल्या अनिल घराळ यांचा अर्ज सुचक कमी असल्याच्या कारणावरून अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे येथे आघाडीला उमेदवार उरलेला नाही. मात्र, भाजपचे उमेदवार असल्याने येथील लढत भाजप विरुद्ध लोकशाही आघाडी, अशी होईल
वकिलांचा फौजफाटा
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी मातब्बरांनी अर्ज दाखल केले आहेत. काहीजण पक्षीय झेंडे हातात घेऊन तर काहीजण आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुक रिंगणात उतरले आहेत. अर्जांची छाननी हा निवडणूक प्रक्रियेमधला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. येथे आपल्या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरू नये म्हणून सर्व पक्ष व आघाड्यांनी जणू वकिलांचा फौजफाटा तयार ठेवला होता. तरीही काहींचे अर्ज अवैध ठरलेच.