‘पोलो’साठी सहा इंच मातीचा थर

By admin | Published: February 8, 2016 10:41 PM2016-02-08T22:41:15+5:302016-02-08T23:49:32+5:30

आज पुण्यात बैठक : महाबळेश्वरमधील मैदानाची वनविभागाकडून पाहणी

Six-inch soil layer for polo | ‘पोलो’साठी सहा इंच मातीचा थर

‘पोलो’साठी सहा इंच मातीचा थर

Next

महाबळेश्वर : येथील पोलो मैदानावरील दगडांचा घोड्यांच्या खुरांना त्रास होऊ नये म्हणून सहा इंच जाडीची लाल माती टाकून त्यावर हिरवळ फुलविण्यात येणार आहे. पोलो खेळाच्या स्पर्धांच्या आयोजनाबाबत अंतिम आराखडा तयार करणे व स्पर्धांच्या आयोजनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ रोजी सायंकाळी साडेसात वाजता पुणे येथील विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात बैठक होणार आहे. दरम्यान, सोमवारी या बैठकीच्या तयारीचा एक भाग म्हणून नगररचना विभाग, वन विभाग व पालिकेचे मुख्याधिकारी यांनी पोलो मैदानाची पाहणी केली. या मैदानावरील राज्यपाल यांनी दिलेल्या आदेशानुसार महाबळेश्वर येथील पोलो मैदानावर उन्हाळी हंगामात पोलो खेळाच्या स्पर्धा भरवून महाबळेश्वर येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत विविध पातळीवर अधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. मंगळवारी अशीच एक महत्त्वाची बैठक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पुणे आयुक्त कार्यालयात होत आहे. या बैठकीला वनविभाग, महसूल विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, वनखात्याचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, उपवन संरक्षक अंजनकर, पालकमंत्री विजयबापू शिवतारे, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल, सार्वजनिक बांधकाम खात्याचे इरिगेशन विभागाचे अधिकारी देशमुख वन विभागाचे वनक्षेत्रपाल सूर्यकांत कुलकर्णी व पालिकेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी आज पोलो मैदानाची पाहणी केली.
मैदानावर किती वृक्ष आहेत, खेळ सुरू असताना मैदानावर असलेले खडक कशा प्रकारचे आहेत व त्याचा घोड्यांना कितपत त्रास होईल आणि त्याबाबत काय उपाययोजना करता येतील या बाबतची सर्व माहिती तयार करण्यात आली आहे, ही माहिती बैठकीत सादर करण्यात येणार आहे. तसेच इतर कोणत्या अडचणी येतील याचा उहापोहही या बैठकीत करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)


खेळासाठी मैदानाच्या विस्ताराची गरज नाही
सध्या उपलब्ध असलेले पोलो मैदान पोलो खेळासाठी पुरेसे आहे. त्यामुळे आता त्या मैदानाचा विस्तार करण्याची काही आवश्यकता नाही. मैदानाचा विस्तार होणारच नसल्याने वृक्षतोड या विषयावर या बैठकीत कोणतीही चर्चा होणार नाही, अशी माहिती वन विभागाचे वनक्षेत्रपाल सूर्यकांत कुलकर्णी यांनी दिली.


२.३४ हेक्टर क्षेत्र तयार करणार
महाबळेश्वर येथील पोलो मैदानावर एप्रिल २०१६ मध्ये प्रदर्शनीय पोलो सामने खेळण्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेल्या ३.६७ हेक्टर पोलो मैदानापैकी केवळ २.३४ हेक्टर क्षेत्रावरील दगड काढणे, माती टाकणे, गवत लावणे, पाणी व वीज याबाबत व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली.


याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या क्षेत्रावरील दगड काढण्याकरिता वन (संवर्धन) अधिनियम १९८० अंतर्गत परवानगी मिळण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे दि. ४ डिसेंबर २०१५ रोजी पत्राने विनंती केलेली आहे. याबाबतचा निर्णय अजून प्राप्त झाली नाही. निर्णय प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल.


प्रस्तावित वनजमीन ही हेरिटेज समितीची मान्यता प्राप्त करण्याकरिता मुख्याधिकारी गिरिस्थान नगरपरिषद, महाबळेश्वर यांनी हेरिटेज समिती अस्तित्वात नसल्याने संचालक नगररचना यांच्याकडे परवानगी प्राप्त करण्याकरिता प्रस्ताव सादर केलेला आहे. पोलो मैदान हे पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट असल्याने उच्चस्तरीय सनियंत्रण समितीची मान्यता प्राप्त करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Web Title: Six-inch soil layer for polo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.