संगममाहुलीत अंत्यसंस्कारासाठी नव्या सहा शवदाहिन्या : चोरगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:39 AM2021-04-18T04:39:28+5:302021-04-18T04:39:28+5:30
सातारा : कोणत्याही शासकीय निधीशिवाय साताऱ्यात बालाजी ट्रस्टमार्फत स्मशानभूमी चालविली जात आहे. सध्या कोरोना बळींची संख्या धोकादायक पातळीवर पोहोचली ...
सातारा : कोणत्याही शासकीय निधीशिवाय साताऱ्यात बालाजी ट्रस्टमार्फत स्मशानभूमी चालविली जात आहे. सध्या कोरोना बळींची संख्या धोकादायक पातळीवर पोहोचली असून, नव्याने सहा दाहिन्या वाढविण्यात आल्या आहेत. कोणत्याही मृतदेहाची विटंबना होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, अशी माहिती बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी शनिवारी दिली.
सातारा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्यामुळे जिल्ह्यातून अनेकजण उपचारासाठी येत असतात. उपचारादरम्यान कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले गेले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये दररोज सरासरी २० बाधितांचा मृत्यू होत आहे. कैलास स्मशानभूमीत दररोज मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गेल्या महिन्याभरापासून बळींची संख्या भयावह होत असताना काही वाहिन्या मोडल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना कल्पना देण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी सिंह यांनी उपजिल्हाधिकारी व पालिका मुख्याधिकाऱ्यांना संयुक्त पाहणीचे आदेश दिले.
अत्यंत विदारक स्थितीची पाहणी केल्यावर तातडीने सहा शवदाहिन्या, तर नंतर चार अशा एकूण दहा दाहिन्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या बळी गेल्यावर नियमानुसार नातेवाइकांना शेवटचे मुखदर्शन दिले जाते. त्यानंतर विधीवत पद्धतीने कैलास स्मशानभूमीतील पथक अंत्यसंस्कार करते. एका अंत्यसंस्कारासाठी आठ तासांचा वेळ लागतो. तीन तास वेळ भडाग्नीसाठी लागतो. त्यानंतर पाच तास ती दाहिनी मोकळी ठेवून तेथील रक्षा नातेवाइकांच्या ताब्यात विसर्जनासाठी देण्यात येते. एका दिवसात दोन पाळ्यांमध्ये अंत्यसंस्कार केले जातात, अशी माहिती चोरगे यांनी दिली.