दहापैकी सहा जणांना नाही पत्नीचा नंबर पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:10+5:302021-07-11T04:26:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला असला तरी त्याने माणसातील नैसर्गिक स्मार्टनेस घालवला हे नक्की! ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला असला तरी त्याने माणसातील नैसर्गिक स्मार्टनेस घालवला हे नक्की! ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात दहापैकी सहा जणांना आपल्या पत्नीचा क्रमांक पाठ नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
माणसांच्या आयुष्यात मोबाइलची एन्ट्री झाल्यानंतर डायरी, रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्र हे सगळेच त्याने गिळंकृत केले. परिणामी, मानवाचे मोबाइलवरील अवलंबित्व वाढत राहिले आहे. शहरातील बाजारपेठ व चौकांमधील नागरिकांना ‘लोकमत’ने आपल्या बायकोचा मोबाइल क्रमांक विचारला तर तो पाठ नसल्याचे समोर आले. त्यामुळे लोक आता पूर्णपणे मोबाइलवरच अवलंबून असल्याचे दिसून आले.
मोबाइल क्रांती होण्यापूर्वी लोकांना घरचा, कार्यालयाचा, नातेवाइकांचा, शेजाऱ्यांचा नंबर पाठ असायचा; पण, आता मोबाइलमध्ये नंबर सेव्ह करण्यामुळे अनेकांनी नंबर पाठांतराकडे पाठ केली आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे आता स्वत:चा नंबर सोडता इतर फोन क्रमांक लोकांना पाठ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
चौकट :
तरुणांपासून वृद्धापर्यंत सारे सारखेच
शहर परिसरात लोकांना विचारणा केली असता अनेकांना एकमेकांचे वाढदिवस, मोबाइल नंबर अशा गोष्टी पाठ नसल्याचे आढळून आले आहे. वाढदिवसाची तारीखही समाजमाध्यमांद्वारे समजते; पण लग्नाच्या वाढदिवसाच्या तारखेचा अनेकांचा गोंधळ आहे. तरुणाईला आई-वडिलांनंतर आपल्या खास मित्र-मैत्रिणींचा वाढदिवर मुखोद्गत आहे. अनेकांनी कुटुंबीयांना संशय येऊ नये म्हणून आपल्या या खास लोकांचे नंबर सेव्ह केले नसल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले आहे. अनेक ज्येष्ठांनी आपल्या आप्तांचे नंबर छोट्या डायरीत लिहून ठेवल्याचेही दाखविले.
कोट :
आमच्या घरात नातू सोडला तर सगळ्यांकडे मोबाइल आहे. रेंजची अडचण असल्याने प्रत्येकाकडे दोन नंबर आहेत. मुलं, पत्नी, सूनबाई यांचेच आठ नंबर झालेत. अडचणीच्या वेळी ते पाठ असले पाहिजेत यात दुमत नाही; पण नंबर पाठ करण्यापेक्षा फोन फुल्ल चार्ज करणं मला अधिक सोपं वाटले.
- प्रा. डॉ. चंद्रकांत माने, पाटण
वय वाढेल तसं मेंदू थकतो
हल्लीची मुलं ही टेक्नोसॅव्ही आहेत. त्यामुळे ते आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतात. याउलट ज्येष्ठांना डायरीत नोंदी करायची सवय असते. अनेक ज्येष्ठांच्या डायरी म्हणजे माहितीचा खजिना असतात. याबाबतीत मुलांना मोबाइल क्रमांकासोबत अनेक गोष्टींचे पासवर्डदेखील अचूक लक्षात असतात.
- डॉ. राजश्री देशपांडे, मनोविकारतज्ज्ञ
पत्नीलाही आठवेना पतीचा नंबर
मुलं आणि पती सोडा मला माझाही दुसरा नंबर पाठ नाही. कोणी नंबर विचारला तर मी त्यांना नंबर डायल करून मिस कॉल देते. कार्यालयीन कामाचा व्याप, नियमित दौरे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना नंबर पाठ असणं हा माझा प्राधान्यक्रमच नाही.
- महिला नोकरदार
मोबाइलमध्ये सर्वांचेच नंबर सेव्ह असल्याने नंबर पाठ करायची गरज पडली नाही. पतीचे दोन नंबर आहेत, त्यातील एक पाठ आहे. त्याच नंबरवर कायम फोन करते, त्यामुळे दुसरा नंबर पाठ करायची गरजच नाही भासली. मुलं त्यांचे नंबर सारखे बदलतात, त्यामुळे ते पाठ नाहीत.
- गृहिणी, सातारा
एकाला वडिलांचा क्रमांक आठवला; पण बायकोच्या नंबरमध्ये त्याचा गोंधळ झाला.
एकाला स्वत:चेच नंबर नीटपणे पाठ नसल्याचे निर्दशनास आले.
एकाला व्यावसायिक नंबरसह स्वत:चा ड्रायव्हर आणि मॅनेजरचे नंबर पाठ होते; पण पत्नीने नवा नंबर घेतल्याने तो पाठ नसल्याची सारवासारव त्यांनी केली.
एकाला बायको आणि मुलांचे पहिले नंबर पाठ होते.
एकाला बायको, भाऊ, बहीण आणि आई-वडिलांचे नंबर पाठ होते; पण स्वत:चा नंबर त्यांच्या लक्षात नव्हता.