तिहेरी अपघातात सहाजण गंभीर

By admin | Published: June 14, 2015 11:54 PM2015-06-14T23:54:49+5:302015-06-15T00:11:28+5:30

वाठारनजीक दुर्घटना : महामार्गावर थांबलेल्या ट्रकला टँकर, कारची धडक

Six people seriously injured in a triple crash | तिहेरी अपघातात सहाजण गंभीर

तिहेरी अपघातात सहाजण गंभीर

Next

मलकापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत रविवारी दुपारी तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. रस्त्यावर थांबलेल्या नादुरुस्त ट्रकला टँकर व त्यापाठोपाठ कारने धडक दिली. या अपघातात सहाजण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धैर्यशील बजरंग पाटील (वय ३५, रा. कामेरी, ता. वाळवा), श्वेता मोहन सुतार (१६), ओमकार मोहन सुतार, शुभम मोहन सुतार (तिघेही रा. पणुंब्रे, ता. शिराळा), मारुती अप्पा लोखंडे, राधिका उत्तम मोरे (दोघेही रा. जयसिंगपूर) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रेशनिंगचे धान्य घेऊन कोल्हापूरला निघालेला ट्रक नादुरुस्त झाल्याने रविवारी दुपारी चालकाने वाठार गावच्या हद्दीत महामार्गावरच थांबविला होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या दूध टँकर (एमएच १० एडब्ल्यू ७४७४)वरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकरची महामार्गावर थांबलेल्या ट्रकला जोराची धडक बसली.
दरम्यान, टँकरच्या पाठोपाठ चंदूर (ता. हातकणंगले) गावाला निघालेल्या कारची अपघातग्रस्त टँकरला धडक बसली. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांसह महामार्ग देखभाल विभागाचे गजानन सकट, अमोल भिसे, अर्जुन सूर्यवंशी, राजू खैरे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी टँकरसह कारमधील जखमींना बाहेर काढले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांपैकी टँकरचालकासह सोळा वर्षीय मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातानंतर काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)

टायर फुटल्याने कार पुलावरून कोसळली
केसुर्डीनजीक अपघात : कोल्हापूरचे पाचजण गंभीर; रुग्णालयात उपचार सुरू; कामगाराच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील केसुर्डी, ता़ खंडाळा गावानजीक महामार्गाचे सुरू असलेल्या अर्धवट पुलावरून टायर फुटल्याने एक कार सुमारे २५ फूट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात कारमधील पाचजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. १४) दुपारी दोनच्या सुमारास घडला.
याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूर येथील जाधव कुटुंबीय कारने (एमएच ०९ एस ८०७६) कोल्हापूरहून पुण्याकडे निघाले होते. संबंधित कार ऋतुराज किशोर जाधव (वय २०) चालवत होता़ केसुर्डी गावानजीक असणाऱ्या राजश्री बागेजवळील महामार्गावर पुलाचे काम सुरू आहे. कार याठिकाणी आली असता अचानक कारचा टायर फुटला. कार भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलावरून थेट २५ फूट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली.
या अपघातात ऋतुराज जाधवसह किशोर जाधव (वय ५५), स्नेहल जाधव (४५), मिनल जाधव (२५) व सायली जाधव (२६) हे सर्वजण जखमी झाले. जखमींमध्ये स्रेहल जाधव गंभीर जखमी झाल्या आहेत़ कार ज्या खड्ड्यात कोसळली तो खड्डा पावसाच्या पाण्याने पूर्णपणे भरला होता.
अपघातावेळी घटनास्थळी असणाऱ्या एका कामागाराने चपळाईने खड्ड्यात उतरून कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे मोठा अनर्थ
टळला. शिरवळ पोलिसांनी नागरिकांच्या व खंडाळा रेस्क्यू टीमच्या मदतीने जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (प्रतिनिधी)






 

Web Title: Six people seriously injured in a triple crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.