जिल्हा परिषदेचे सहा हजार कर्मचारी संपात, कार्यालये सुनीसुनी; जुन्या पेन्शनची मागणी
By नितीन काळेल | Published: March 14, 2023 08:28 PM2023-03-14T20:28:27+5:302023-03-14T20:28:56+5:30
अधिकाऱ्यांची हजेरी कायम
सातारा : जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय. त्यामुळे दररोजच कामासाठी येणाऱ्यांची वर्दळ असायची; पण, जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेतील विभाग सुनेसुने झाले; तर जिल्हा परिषदेअंतर्गत सुमारे सहा हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
याबाबत संघटनांच्या वतीने देण्यात आलेली माहिती अशी की, २००५ च्या नोव्हेंबर महिन्यानंतर राज्यातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे. मात्र, ही योजना लागू करण्यासाठी कर्मचारी संघटनांच्या वतीने वारंवार आंदोलने करण्यात आली. मात्र, त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. तसेच वेतनातील त्रुटीचाही मुद्दा कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. आता जुनी पेन्शन सुरू करणे, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पे आणि सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, समान काम आणि समान पदोन्नती टप्पे, बदल्यांतील अन्यायकारक धोरण रद्द करणे, सुधारित आकृतिबंधात लिपिकांची पदे वाढविणे, आदी मागण्या आहेत. यासाठी संप सुरू केला आहे.
मंगळवारपासून हा संप सुरू झाला. सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत माध्यमिक शिक्षक सोडून सुमारे ११ हजारांवर अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती, गावांमध्ये हे कर्मचारी आहेत. पहिल्या दिवशी ५ हजार ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला; तर पूर्व परवानगीने काही कर्मचारी रजेवर आहेत; सुमारे ४,९०० कर्मचारी कामावर होते. यांतील बहुतांश शिक्षक आहेत. कारण प्राथमिक शिक्षकांमधील एका संघटनेने या संपात भाग घेतला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे संपात सहभागींचा आकडा कमी झाला आहे.
या आंदोलनात जिल्हा परिषदेकडील शिक्षक, लिपिक, अधीक्षक, ग्रामसेवक, शाखा अभियंता, शिपाई, नर्सेस, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षक, आरोग्यसेवक, आदी सहभागी झाले आहेत. यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. अधिकारी फक्त कार्यालयात येऊन बसत आहेत; पण कर्मचारीच नसल्याने कामाला वेग येईना, अशी स्थिती आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना विभागांची जबाबदारी
जिल्हा परिषदेतील सर्व विभाग उघडे ठेवण्यात आले आहेत. मात्र, कामावर कर्मचारीच हजर नाहीत; त्यामुळे लोकांना अडचणी येऊ नयेत, त्यांची निवेदने घेणे, माहिती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विभागांची जबाबदारी दिली आहे. हे कर्मचारी विभागात थांबून अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत.