महामार्गाचे सहापदरीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर !
By admin | Published: December 31, 2015 10:54 PM2015-12-31T22:54:56+5:302016-01-01T00:05:19+5:30
आंदोलनाचा पवित्रा : ओढ्याचे नैसर्गिक प्रवाह बदलून शेतीमध्ये सोडले
पाचवड : राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या सुरू असलेल्या सहापदरीकरणाच्या दिशाहीन व ढिसाळ नियोजनाविरोधात ‘लोकमत’ने वेळोवेळी आवाज उठवूनसुद्धा बेलगाम झालेल्या ठेकेदारांनी त्यांचा मनमानी कारभार सुरूच ठेवलेला आहे. शेतकऱ्यांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या मालिकेमधील आणखी एक शृंखला म्हणजे पाचवड गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यानजीक असलेल्या ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून तो महामार्गाशेजारील शेतकऱ्यांच्या थेट शेतीमध्ये सोडण्यात आला आहे. याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता हा गंभीर विषय दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पीडित शेतकऱ्यांनी सांगितले.
विकासाच्या प्रक्रियेतील महामार्गाचे सहापदरीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून, प्रशासनानेही याबाबतची योग्य दखल न घेतल्याने सर्व पीडित शेतकरी व ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.
महामार्गापासून वाई तालुक्यातील पाचवड गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यानजीक मोठा ओढा आहे. या ओढ्यावर महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या ओढ्याचा प्रवाह पश्चिमेकडून आला असून, तो महामार्ग ओलांडल्यानंतर उत्तरेकडे जाऊन मोठ्या ओढ्याला मिळतो. हा नैसर्गिक प्रवाह आहे; परंतु होऊ घातलेल्या सहापदरीकरणामध्ये या ओढ्याचा महामार्ग ओलांडल्यानंतर उत्तरेकडे जाणारा नैसर्गिक प्रवाह, महामार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदारांनी पूर्णपणे बंद केला आहे. तो पूर्वेकडील शेतकऱ्यांच्या बागायत शेतीमध्ये सोडण्यात आला आहे. सध्या दुष्काळी स्थिती असल्याने या ओढ्याला पाणी नाही; परंतु भविष्यात पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर या ओढ्याला पाण्याचा मोठा प्रवाह येणार आहे. यापूर्वीही मोठ्या पर्जन्यवृष्टीनंतर या ओढ्याला पूर आलेले आहेत. हे पाणी प्रवाह बदलल्याने थेट शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाणार असून, भविष्यात बागायत शेतीची मोठी हानी होणार आहे. हा प्रवाह पुढे पाचवडमध्ये जाणाऱ्या रस्त्याकडे जाणार आहे. हा रस्ताही रहदारीसाठी बंद होणार आहे. हा सर्व प्रकार महामार्गाच्या ठेकेदारांच्या लक्षात येऊनसुद्धा मंजुरी वरून घ्यावी लागेल, असे सांगत हात झटकले आहेत. (वार्ताहर)
जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन
वारंवार विनंती करूनही मनमानी करणाऱ्या महामार्गाच्या ठेकेदारांविरोधात सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन न्याय मिळविण्यासाठी महामार्गाचे कामकाज थांबवून प्रसंगी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. संबंधित पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेही या संदर्भात निवेदन देऊन दाद मागितली आहे.