शाळेतून घरी जाताना कारची धडक, जखमी सहा वर्षांच्या चिमुकलीचा अखेर मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 06:17 PM2022-04-16T18:17:32+5:302022-04-16T18:52:11+5:30
बरड गावातील राणाई मळ्याजवळ भरधाव कारने तिला जाेरदार धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली.
सातारा : महिनाभरापूर्वी भरधाव कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सहा वर्षांच्या चिमुकलीचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बरड, ता. फलटण येथे घडली. शुभांगी ज्ञानेश्वर पिसाळ (वय ६, रा. बरड, ता. फलटण) असे अपघातात मृत्यू पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुभांगी पिसाळ ही चिमुकली २८ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बरड गावातील शाळेतून घरी जात होती. त्यावेळी बरड गावातील राणाई मळ्याजवळ भरधाव कारने तिला जाेरदार धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली.
अपघातानंतर तिला तातडीने फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारादरम्यान तिचा अखेर मृत्यू झाला.