‘रयत’मध्ये कौशल्याधारित शिक्षण - अनिल पाटील : कर्मवीर अण्णांची तत्त्वे डोळ्यांसमोर ठेवूनच शतकमहोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 01:10 AM2018-12-25T01:10:37+5:302018-12-25T01:14:34+5:30
‘पुरोगामी, सत्यशोधक चळवळ आणि सामाजिक, शैक्षणिक सुधारणांच्या पायावर रयत शिक्षण संस्था सुरू झाली. आज जागतिकीकरणाची स्पर्धा लक्षात घेत संस्था पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षण देत आहे.
सातारा : ‘पुरोगामी, सत्यशोधक चळवळ आणि सामाजिक, शैक्षणिक सुधारणांच्या पायावर रयत शिक्षण संस्था सुरू झाली. आज जागतिकीकरणाची स्पर्धा लक्षात घेत संस्था पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षण देत आहे. राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमात रयतने सक्रिय सहभाग घेतल्यामुळे भविष्यात संशोधक निर्माण करण्याची तयारी आम्ही केली आहे,’ अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी दिली.
रयत शिक्षण संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या कार्याविषयी माहिती आणि संवाद साधण्याच्या निमित्ताने डॉ. पाटील यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. त्यावेळी डॉ. पाटील यांनी संस्थेची वाटचाल, भविष्यातील नियोजन याविषयी सविस्तर चर्चा केली.
डॉ. पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रातील १५ आणि कर्नाटक राज्यातील १ अशा १६ जिल्ह्यात संस्थेचा कार्यविस्तार आहे. जागतिकीकरणाच्या कालखंडात कर्मवीरांची वैचारिक बैठक अबाधित ठेवून संस्थेने आपल्या शैक्षणिक धोरणात सातत्याने सकारात्मक बदल केले आहेत. संगणक, शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जैवतंत्रज्ञान, रयत आॅलिम्पियाड, गुरुकुल प्रकल्प, कृषी तंत्रज्ञान, रयत विज्ञान परिषद यासारख्या अनेक प्रकारच्या उपक्रमातून उच्च दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. रयत शिक्षण संस्था, टाटा टेक्नॉलॉजी व सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळावे आणि त्यांच्याकडून दर्जेदार निर्मिती व्हावी, यासाठी इनोव्हेशन, इनव्हेन्शन आणि इनक्युबेशनची चार केंद्रे संस्थेच्या खारघर, हडपसर, सातारा व अहमदनगर येथे स्थापन करून नवीन उद्योजकांना प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प संस्थेने हाती घेतला आहे. याशिवाय मनुष्यबळ विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने संस्थेच्या १४ महाविद्यालयांत पदवी स्तरावर कोर्सेस सुरू केले आहेत. या माध्यमातून ज्ञानाने परिपूर्ण असलेला आणि समाजाला आवश्यक असलेला प्रशिक्षित विद्यार्थी निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प संस्थेने हाती घेतला आहे. समाजाच्या गरजा ओळखून संस्थेने आपल्या शैक्षणिक उपक्रमात नेहमीच सकारात्मक बदल केले आहेत. याच बदलाचा भाग म्हणून पारंपरिक शिक्षणाला व्यवसायाभिमुख शिक्षणाची जोड दिली आहे.
कृषी मार्गदर्शन केंद्रे
जैन इरिगेशन, बीव्हीजी व फ्युचर अॅग्रीकल्चर लिडरर्स आॅफ इंडिया यांच्या सहकार्यातून संस्थेच्या १५ महाविद्यालयांमध्ये कृषी मागदर्शन केंद्र सुरू केले आहे. या केंद्रांमार्फत महाविद्यालयातील विद्यार्थी व परिसरातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शनकेले जाते. शेती उत्पादन, शेतमाल विक्री व्यवस्थापन, शेतमाल प्रक्रिया, शेतीविषयक
विविध योजना आदींचे मार्गदर्शन केले जात आहे. याचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे
दिले गेले.
सायन्स सेंटर अन् गणित प्रयोगशाळा !
विज्ञानाबरोबरचं कृतियुक्त व प्रत्यक्ष अनुभवाद्वारे विद्यार्थ्यांना ज्ञान ग्रहणाची सवय लागावी व विद्यार्थी कार्यप्रवण व्हावेत, या उद्देशाने प्रत्येक विभागात गणित प्रयोगशाळा उभारणीचे काम सुरू आहे. २५० शाखांची निवड करून २५० शिक्षकांचे प्रशिक्षण झाले. या सर्व शाखांत गणित प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. सुमारे २०० शाखांमध्ये ही प्रयोगशाळा सुरू आहे. त्याबरोबरच सर्व विभागातील मिळून ९० शाखांची निवड मिनी सायन्स सेंटर्स प्रकल्प राबविण्यासाठी केली आहे. या सर्व शाखांत मिनी सायन्स सेंटरचे काम सुरू आहे.सातत्याने विज्ञानासंबंधी प्रयोग व प्रदर्शनांचे आयोजन केले जाते.
संकल्पना बँकेतून मोठी निर्मिती
व्यावहारिक जीवनामध्ये उपयोगी पडतील, अशा नावीन्यपूर्ण संकल्पना संस्थेच्या तज्ज्ञ कमिटीकडून छाननी करून गुणानुक्रमे निवडण्यात येतील. त्यानुसार निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या आयडियासाठी संस्थेच्या सीड कॅपिटलमधून आर्थिक मदत देण्यात येईल. विद्यार्थ्याला त्याची आयडिया संस्थेच्या इन्होव्हेशन सेंटरच्या माध्यमातून विस्तार करून पूर्णत्वास नेण्यात येईल व त्याचे पेटंट मिळविण्यापर्यंतची मदत होते.
कौशल्य विकास व इतर उपक्रम
संस्थेची अद्ययावत अशी मोबाईल सायन्स व्हॅन आहे. दुर्गम भागातील शाखांना या व्हॅनचा उपयोग होतो. यंदा ११४ ठिकाणी मोबाईल सायन्स व्हॅन उपलब्ध करून दिली आहे.
खेळातून विज्ञान शिक्षण संकल्पनेचा फायदा शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी करून घ्यावा, यासाठी पाचवी व सहावीला शिकविणाºया शिक्षकांना गेम बेस्ड लर्निंगचे प्रशिक्षण दिले.
विविध कारणांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रगती विद्यालयाची सुरुवात १४ वर्षांपूर्वी करण्यात आली आहे.
कर्जतमध्ये पॅरामिलिटरी फोर्स स्कूल
मुलींसाठी डायरेक्ट कमिशन सेंटर
रयतने ५ संशोधक देशाला दिले.
२९ ठिकाणी जलयुक्त शिवारची उभारणी
आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांसाठी शाळा
दहिवडी येथे क्रीडा अकादमीची सोय
१ लाख संकल्पनांची बँक
विद्यार्थ्यांना उद्योगासाठी बीजभांडवल
रयत शिक्षण संस्थेतील १९ पैकी १४ कॉलेजला नॅकचा अ वर्ग मिळाला आहे. तर ६ महाविद्यालये स्वायत्त झाली आहेत. त्यामुळे पुढील काळात रयत मधील महाविद्यालयांची कल्स्टर युनिव्हर्सिटी करण्याचे नियोजन सुरू आहे.
रयतची कल्स्टर युनिव्हर्सिटीकडे वाटचाल
संस्था विस्तार
हॉस्टेल : ९१
डीएड. : ७
आश्रम : ८
आयटीआय : ३
शाळा / महाविद्यालय
बालकमंदिर : ३५
प्राथमिक : ५१
माध्यमिक : ४३८
शिक्षक : ११,००० विद्यार्थी : ४,५८,०००
मुली : २, २१,००० मुलं : २,३९,०००
ज्युनिअर कॉलेज : ३५४
माध्यमिक कॉलेज : ४२