सिव्हीलचा आसमंत गहिवरतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:38 AM2021-04-18T04:38:51+5:302021-04-18T04:38:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केल्याने जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये आक्रोशाने टाहो फोडत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केल्याने जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये आक्रोशाने टाहो फोडत आहेत. यातून जिल्ह्याची रुग्णवाहिनी समजले जाणारे जिल्हा शासकीय रुग्णालयही सुटले नाही. केवळ धाप लागली म्हणून रुग्णालयात ॲडमिट केल्यानंतर आप्तस्वकीयाचा अचानक मृत्यू होतोय, हे समजल्यानंतर बाहेरील व्हरांड्यात नातेवाईकांनी केलेला आक्रोश आसमंतात टाहो फोडतोय. हे काळीज पिळवटून टाकणारे दृश्य मन सुन्न करून जाते.
कोरोनाची महामारी अचानक रौद्ररूप धारण करेल, असं कोणालाही वाटलं नाही. एखादा महापूर यावा तशी ही अक्राळविक्राळ लाट जिल्ह्यात येऊन धडकलीय. काहीना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही तर काहींना होतोय. अशी एकंदरीत परिस्थिती असताना रुग्णालये अगदी खचाखच भरली आहेत. जिल्ह्याचे मुख्य केंद्र समजले जाणार जिल्हा शासकीय रुग्णालय हे नातेवाईक आणि रुग्णांच्या रहदारीने अक्षरश: गजबजून गेलेय. सिव्हीलमधील आणि सिव्हीलच्या बाहेरील परिस्थिती अत्यंत विदारक अशी आहे. हृदय हेलावून टाकणारी दृश्य नजरेस पडत आहेत. जो-तो आपल्या आप्तस्वकीयांच्या काळजीने भयभीत झालेला पाहायला मिळतोय. कोरोना वॉर्डच्या बाहेर नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. एकाचा मृत्यू झाल्यानंतर काही तासात आणखी दुसऱ्याचा मृत्यू झाल्याची खबर बाहेर येताच नातेवाईकांचा आक्रोश गगनाला भिडत आहे. कोणाचे कुटुंबप्रमुख तर कोणाचा मुलगा कोरोनाने हिरावून नेलाय.
जिथं कोरोना चाचणी केली जाते, त्याच्या शेजारी कोरोना वॉर्ड आहे. त्यामुळे चाचणी करण्यासाठी आलेले रुग्ण कोरोना वाॅर्डातील आक्रोश पाहून आणखीनच चिंतेत पडत आहेत. याठिकाणी भयभीत झालेले चेहरे आणि चिंतायुक्त वातावरण सिव्हीलच्या आजूबाजूला पाहायला मिळतेय. दोनच दिवसांपूर्वी जावळी तालुक्यातील आंबेघर येथील एका महिलेच्या पतीला जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. मुलांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून त्या स्वतः रात्रंदिवस कोरोना वार्डच्या बाहेर पती कधी बरे होताहेत, याची वाट पाहत होत्या. मात्र, शनिवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांना अचानक सांगण्यात आले, पतीचे निधन झालेय. आभाळ कोसळल्यासारखं संकट त्यांच्यावर कोसळलं. त्या बाहेर एकट्याच धाय मोकलून रडू लागल्या. आजूबाजूने येणारे लोक स्वतःच्याच चिंतेत होते. एकमेकाला कोणी आसरा व आधार द्यायलाही नाही. या आंबेघरच्या महिलेचा आक्रोश सुरू असतानाच आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी वाॅर्डबाहेर थडकली. त्याही नातेवाईकांनी फोडलेला टाहो मन सुन्न करणारा होता. बाहेर रुग्णवाहिका मृतदेह नेण्यासाठी थांबली होती. आता शेवटचं आपल्या आप्तस्वकीयांना पाहून त्यांना निरोप देण्याची वेळ त्यांच्यावर आली. हे विदारक चित्र पाहून कोरोनाची भीषणता किती आहे, याची प्रचिती आल्यावाचून राहात नाही.
चौकट : झाडाखाली नातेवाईकांचा आसरा
सिव्हीलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. एका रुग्णासोबत एकानेच थांबावे, असे शासनाचे आदेश असले तरी काळजीपोटी घरातील तीन ते चार लोक सिव्हीलसमोर थांबत आहेत. हे लोक झाडाचा आसरा घेऊन रात्रंदिवस राहात आहेत.
चौकट : ॲम्बुलन्सचा सायरन वाजल्यास भरतेय धडकी
सिव्हीलच्या परिसरात पाच मिनिटाला ॲम्बुलन्सचे सायरन वाजत आहेत. हा सायरनचा आवाज ऐकूनच नातेवाईकांचे डोळे विस्फारतात. जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून रुग्ण रुग्णालयात आणले जात आहेत. इतकी भयानक परिस्थिती सध्या सिव्हीलमध्ये पाहायला मिळत आहे.
फोटो ःआहेत