आभाळच फाटलं... ढेबेवाडी विभागात पावसाचा कहर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:23 AM2021-07-23T04:23:47+5:302021-07-23T04:23:47+5:30
ढेबेवाडी : रात्रभर कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे वांग नदीला आलेल्या महापुरात गेल्यावर्षी वाहून गेलेला जिंती-जितकरवाडी पूल यंदा पुन्हा एकदा वाहून ...
ढेबेवाडी : रात्रभर कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे वांग नदीला आलेल्या महापुरात गेल्यावर्षी वाहून गेलेला जिंती-जितकरवाडी पूल यंदा पुन्हा एकदा वाहून गेल्याने जिंती विभागातील, तर गेल्या चार वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेला मंद्रुळकोळे येथील पुलासह वांग नदीच्या उत्तर फाट्यावरील कमी उंचीचे सर्व पूल पाण्याखाली गेल्याने विभागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. महिंद येथे अतिवृष्टीने शेतीत पाणी घुसून भात शेती वाहून जाऊन शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या २५ दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांचे चार दिवसांपूर्वी पावसाने हलक्या सरीच्या स्वरुपात का होईना पावसाचे आगमन झाल्याने समाधान झाले; पण मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळून ती पूर्ण झाली; पण अतिवृष्टीत झाल्याने विभागातील वांग नदीच्या उत्तर फाट्यावरील महिंदपासून खाली कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेले व दळणवळणावर परिणाम होऊन वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली आहे.
दरवर्षी बाचोली, बनपुरी, मंद्रुळकोळे, खळे, काढणे, पवारवाडी (कुठरे) असे पूल पाण्याखाली जातात; पण यंदा या पुलापैकी, काढणे व कुठरे पवारवाडी पुलांचे नूतनीकरण होऊन उंची वाढविल्याने तेथील वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र, बाचोली, बनपुरी, बनपुरी-भालेकरवाडी, शितपवाडी, मंद्रुळकोळे हे पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी ही गावे व वाड्या-वस्त्यांची वाहतूक खंडित होऊन विस्कळीत झाली आहे.
२०१९-२० मध्ये जिंती विभागात वांग नदीच्या दक्षिण फाट्यावर नव्याने बांधलेला जितकरवाडी येथील पूल पहिल्याचवर्षी आलेल्या महापुरात वाहून गेला होता. पुन्हा त्याचे नूतनीकरण केले; पण बुधवारच्या अतिवृष्टीत आलेल्या महापुरात तो पूल पुन्हा वाहून गेल्याने तेथील नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
(चौकट)
भात पिकाचे नुकसान...
महिंद (ता. पाटण) गावालगतच असलेल्या सळवे (ता. पाटण) येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीत डोंगर उतारावरून येणारे पाण्याचे लोट घुसल्याने या शेतकऱ्यांच्या शेतीत चरी पडण्याबरोबरच रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने पाण्याचा प्रवाह गतिमान होऊन भातपीकही वाहून जाऊन नुकसान झाले आहे.
--------------------------------------------------------
२२वांग नदी
२२जितकरवाडी पूल