कास रस्त्यावर दरडी कोसळण्याचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:41 AM2021-05-21T04:41:36+5:302021-05-21T04:41:36+5:30

सागर गुजर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा ते कास या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रुंदीकरणासाठी यवतेश्वरच्या ...

Slaughter crash session on Kas Road | कास रस्त्यावर दरडी कोसळण्याचे सत्र

कास रस्त्यावर दरडी कोसळण्याचे सत्र

googlenewsNext

सागर गुजर

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा ते कास या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रुंदीकरणासाठी यवतेश्वरच्या डोंगराला वरखडे काढण्यात आले आहेत. डोंगर फोडून रस्ता रुंद केलेला आहे. आता खडक मोकळे झाल्याने एकाच पावसात या रस्त्यावर दरडी कोसळल्या. दरडी कोसळण्याचे सत्र सुरू राहिल्याने स्थानिक जनता भयभीत आहे.

कासपासून सातारापर्यंत वळणावळणाचा घाट आहे. २७ किलोमीटरचे हे अंतर निसर्ग संपन्न आहे. आता रस्त्यावर रहदारी वाढल्याने शासनाने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. एका बाजूला दरी असल्याने दुसऱ्या बाजूला रस्त्याचे रुंदीकरण झालेले आहे. रुंदीकरण करण्यासाठी डोंगर फोडण्यात आले. डोंगर कड्यांची माती ढिली झाली आहे. निसर्गाचा आनंद घेत पर्यटक कास वासोट्याची सफर करतात, आता मात्र डोंगरकडे कोसळत असल्याने पर्यटकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच कास परिसरातील स्थानिक जनता नित्यनेमाने सातारा शहरात येत असते. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरकडे जागोजागी कोसळलेले पाहायला मिळाले. प्रशासनाने वेळीच रस्त्यावर पडलेले मातीसाठी बाजूला केला. आता तर इथून पुढे पावसाचा कालावधी आहे, त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर डोंगर-कडे कोसळू शकतात, हे लक्षात घेऊन प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

लाल माती आणि भूसख्खलन..

कासच्या पश्चिमेला डोंगर परिसर आहे या परिसरात लाल माती आहे. रस्ता तयार करण्यासाठी डोंगर पोखरले यानंतर या डोंगराची माती आता मोकळी झालेली आहे. तसेच माती पकडून ठेवणारे वृक्ष देखील राहिले नसल्याने या लाल मातीचे मोठ्या प्रमाणावर भूसख्खलन होत आहे.

काय करता येईल?

कास रस्त्याच्या एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला डोंगर आहे. डोंगराच्या बाजूला रुंदीकरण करण्यात आले आहे, यासाठी सर्वच ठिकाणी डोंगर करण्यात आलेला आहे या पोखरलेल्या डोंगराला जाळी बसवली तर डोंगराची धूप थांबेल, तसेच या डोंगरावर वृक्ष लागवड केली तरी वृक्षांच्या मुळांमुळे डोंगर कोसळणे थांबेल.

कोट..

कास परिसरात राहणाऱ्या स्थानिक जनतेला भाजी विक्री तसेच दूध विक्रीसाठी शहरात रोज यावे लागते. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात ठिकठिकाणी दरडी कोसळत होत्या. अजूनदेखील कडे कोसळत असल्याने भीती असून प्रशासनाने याबाबत कायमचा तोडगा काढावा.

- प्रदीप पवार

फोटो ओळ : सातारा कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटात अशा पद्धतीने पावसामुळे दरड कोसळली होती. (छाया: सागर चव्हाण)

Web Title: Slaughter crash session on Kas Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.