झाडांची कत्तल; मात्र वारुळाला अभय!
By Admin | Published: February 2, 2015 09:36 PM2015-02-02T21:36:33+5:302015-02-02T23:58:08+5:30
वाठार-फलटण रस्ता : बांधकाम विभागाच्या अंधश्रध्देची परिसरात चर्चा
आदर्की : फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते व वाठार-फलटण रस्त्यावरील साईडपट्ट्यावरील हजारो वृक्षांच्या फाद्या तोडतात; परंतु डांबरी रस्त्याला लागून चार-पाच फूट उंचीच्या मातीची शेकडो वारुळांना हात लावत नसल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने अंधश्रद्धा जपल्याची चर्चा सुरू आहे.फलटण तालुक्यात १९७२ च्या दुष्काळी, दिवंगत चिमणराव कदम यांनी रस्त्याचे जाळे रोजगार हमी योजनेतून कामे करून ग्रामीण भाग शहराकडे दळणवळणाने जोडला; परंतु त्यानंतर बहुतांशी लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद पडले. पाच वर्षे अनेक रस्त्यांवर कोट्यवधी रुपये कागदोपत्री खर्च केले. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची वर्षात चाळण झाली. तर अनेक ठेकेदारांनी साईडपट्ट्यांची कामेच केली नाहीत. त्याचाच परिणाम रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे मोठी झाली. त्याबरोबर वारुळांची संख्या शेकडोत गेली; कर्मचाऱ्यांनी गत महिन्यात काटेरी झुडपे तोडताना चांगल्या झाडांच्या फांद्या तोडून सरपणासाठी ढाब्यावर नेल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)
वारूळ देतायत अपघातांना आमंत्रण
रस्त्यावर अगदी डांबराशेजारी वाठार-फलटण रस्त्यावर एक फूट ते पाच फुटांपर्यंत ३५ वारुळांची संख्या आहे. तर ग्रामीण भागातील रस्त्यावर शेकडोत वारुळांची संख्या आहे. वारुळे अपघातास निमंत्रण देत आहे; परंतु बांधकाम खात्याचे कर्मचारी वारुळ हे नागोबाचे घर म्हणून काढीत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने अंधश्रद्धा जपल्याची चर्चा प्रवासी वर्गात सुरू आहे.