झोपायला भुई अन् पांघरायला आभाळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:10 PM2019-05-13T23:10:01+5:302019-05-13T23:10:07+5:30

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागातील आणि सोलापूर जिल्ह्यामधील मेंढपाळ दुष्काळामुळे सातारा परिसरात वास्तव्यास ...

Sleeping brown and dressing in the sky! | झोपायला भुई अन् पांघरायला आभाळ !

झोपायला भुई अन् पांघरायला आभाळ !

Next

नितीन काळेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागातील आणि सोलापूर जिल्ह्यामधील मेंढपाळ दुष्काळामुळे सातारा परिसरात वास्तव्यास आहेत. ढेकळाच्या रानात पाल उभारून मेंढरांबरोबर दिवस ढकलत आहेत. झोपायला भुई आणि पांघरायला आभाळ अशी त्यांची स्थिती आहे. आता तर गावाकडे पाण्याची वाणवा म्हणून सुटी लागल्याने शाळकरी मुलंही आई-वडिलांबरोबर मेंढरामागच्या फुफाट्यात जीवनाचा अर्थ शोधू लागलीत.
सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग आणि सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. या भागात मेंढपाळ वर्ग अधिक. त्यामुळे लहान जनावरे जगविण्यासाठी काही मेंढपाळ वर्ग दरवर्षी दिवाळी करून जनावरे जगविण्यासाठी गाव सोडतो. उन्हाळा संपेपर्यंत हा मेंढपाळ वर्ग मराठवाडा आणि सातारा, वाई, पाटण परिसरात येतो. वर्षानुवर्षांचे हे गणित; पण गेल्यावर्षी पाऊसच पडला नाही. त्यामुळे अनेक मेंढपाळांनी गावाला वृद्ध आई-वडील, शाळकरी मुलांना सोडून मेंढरामागे भटकंती सुरू केली. माण तालुक्यातील पळसावडेचे पोपट रामचंद्र काळे, अक्षय भगवान धुलगुडे आणि नितीन भगवान शेळके यांचा समावेश आहे. तर सोलापूर जिल्ह्याच्या फोंडशिरसचे (ता. माळशिरस) तात्याबा जगू शेळके हे वास्तव्यास आहेत. हे सर्वजण धावडशी परिसरात ढेकळाच्या रानात पाल उभी करून पावसाळा सुरू होईपर्यंतचे दिवस मोजत आहेत. सकाळी एकदा मेंढरं वागरंबाहेर काढली की दिवसांत किती किलोमीटर चाऱ्यासाठी फिरावं लागंल, हेही त्यांना माहीत नसतं. मेंढराच्या एका-एका खांडव्यामागं दोघं-तिघं तरी राहतात. कारण, आजूबाजूला पीक असल्यानंतर मेंढरं पिकात शिरण्याचा धोका असतो. त्यामुळे सर्वांना विविध बाजूला थांबून हा हू करत मेंढरं चारावी लागतात. सायंकाळी पालावर गेल्यावर कोणी विहिरीतून किंवा जवळपास हातपंप असेल तर पाणी आणतो. कोणी, मेंढ्या वागरत बसवतो. तर कोणी तेल, मीठ भाजी आणण्यासाठी एखादं खेडेगाव जवळ करतो, अशी स्थिती.
सायंकाळी मग सर्वजण एकत्र येत भाकरीचा एक-एक घास तोंडात घालत उद्या कुठं मेंढर घेऊन जायचं, यावर चर्चा करतात. भाकरी खाऊन झाली की तिथंच ढेकळात काहीतरी चादर, वाकळ टाकतात आणि झोपतात. अंगावर काही घेत नाहीत, घेतलं तरी दिवसभराच्या फिरण्यानं झोप कधी लागते तेही कळत नाही. झोपायला भुई आणि पांघरायला आभाळ यातच सकाळ कधी होते, ते ही समजत नाही. उठल्यानंतर मग नव्या दिवसाची नवी तयारी सुरू होते.
सातारा परिसरात आलेल्या मेंढपाळांचं हे जीवन असलं तरी आता त्यांच्याबरोबर मुलंही गावावरुन आलीत. शाळेला उन्हाळ्याची सुटी लागलीय; पण गावाला पाणी नाही म्हणून ही मुलं वडील, नातेवाइकांच्या मागं रान तुडवू लागलीत.

गावातील माणसाला रानात राहू वाटतं का ?
सातारा परिसरात वास्तव्यास असलेल्या अक्षय धुलगुडे हा आईबरोबर मेंढ्या घेऊन आलाय. आता दहावीची परीक्षा दिलेली बहीणही साताºयाकडं आली आहे. गावाकडं दुष्काळ असल्यानं तिला इथं करमतं का? असा प्रश्न केला. यावर ती म्हणाली, ‘गावाकडं राहणाºया माणसाला रानात इथं करमंल का?’ हे तिचं उत्तर खरंच काळजाला चर्रर्र करून जाणारंच ठरलं.
मेंढरं बसविण्यासाठी पैसे किंवा धान्य...
सातारा परिसरातील अनेक भाग बागयती. त्यामुळे येथे मेंढरांना खाण्यासाठी चारा आहे. बाभळीचा डहाळा, मोकळी आणि पिकं काढलेल्या रानात मेंढरं चरतात. तसेच कोणाही शेतकऱ्यांच्या रानात रात्री मेंढरं बसवली जातात. एक रात्र मेंढ्या बसविण्यासाठी मेंढपाळांना २०० ते २५० रुपये किंवा दोन पायली धान्य मिळते.

Web Title: Sleeping brown and dressing in the sky!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.